आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Art News In Marathi, Nagar Municipal Corporation, Divya Marathi, Painter

लाखमोलाच्या चित्रांचा ठेवा जपला नाही..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या कौन्सिल हॉलला वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत लाखमोलाची चित्रे जळाली. त्यात काही चित्रे तर देऊस्कर यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेली होती. या चित्रांचे डॉक्युमेंटेशन मनपाने केले नव्हते. त्यामुळे या चित्रांचे पुनर्निर्माण करणे अवघड झाले आहे.


जगप्रसिद्ध चित्रकार रामकृष्ण देऊस्कर (1870-1957) आणि त्यांचे पुतणे गोपाळराव देऊस्कर यांचे (1911-1994) लहानपण नगरमध्ये गेले. गोपाळरावांचा जन्म नगरचा. त्यांच्या घराण्यालाच कलेचा वारसा मिळाला होता. त्यांचे वडील दामोदर देऊस्कर नगरच्या मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. आजोबा मूर्तिकार होते. दामोदर यांचा अकाली मृत्यू झाला. काही वर्षे सोसायटी हायस्कूलमध्ये शिकल्यानंतर गोपाळराव हैदराबादमध्ये आपले काका रामकृष्ण यांच्याकडे गेले, अशी माहिती ज्येष्ठ चित्रकला शिक्षक भालचंद्र घारे यांनी दिली.


हैदराबादमध्ये जगविख्यात सलारजंग म्युझियम उभारण्यात रामकृष्ण देऊस्करांचे फार मोलाचे योगदान आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवन, संसदभवन, सर्वोच्च न्यायालय, मुंबईतील विधिमंडळ येथे गोपाळराव देऊस्करांनी काढलेली चित्रे झळकत आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्वांचे अजरामर चित्र गोपाळराव देऊस्करांनीच रेखाटले आहे. भारतातील अनेक नामांकित संस्थानिकांनी रामकृष्ण देऊस्करांकडून आपली चित्रे काढून घेतली. आज त्यांचे मूल्य कोटींच्या घरात आहे. नगरचे रावबहाद्दूर ग. कृ. चितळे यांचे त्यांनी काढलेले चित्र कौन्सिल हॉलमध्ये होते. हॉलला लागलेल्या आगीत यासह सर्व चित्रांची राखरांगोळी झाली. कौन्सिल हॉलचे पुनर्निमाण करून तेथे चित्रे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तथापि, या चित्रांचे कोणतेही डॉक्युमेंटेशन महापालिकेने केलेले नाही. त्यामुळे या चित्रांच्या नकला तयार करणेही अवघड होणार आहे.


सांस्कृतिक हानी..
देऊस्करांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार येथे जन्माला आले, ही नगरकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या इतकी रंगछटांची उत्तम जाण आणि रेखाटनावर प्रभुत्व असलेले फार थोडे चित्रकार होऊन गेले. त्यांचे चित्र जळाल्याने नगरची सांस्कृतिक हानी झाली. त्यांची स्मृती नगरकरांनी जपायला हवी..’’ योगेश हराळे, चित्रकार.