आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविश्व: कलेतच जगण्याचा खरा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्र समाजाच्या हितासाठी मरणारी माणसे कायम जिवंत राहतात. माणूस आनंदाच्या मागे पळतो, पण जगण्याचा खरा आनंद कलेतच असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. दिवंगत चित्रकार गोपाळ देऊस्कर यांच्या स्मरणार्थ शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन कलाजगत आयोजित अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन हजारे यांच्या हस्ते कागदावर कुंचल्याची रेष मारून करण्यात आले. व्यासपीठावर अभिनेता मनोज जोशी, नरेंद्र फिरोदिया, प्रमोद कांबळे, परीक्षक अक्षयकुमार झा, दत्तात्रेय पाडेकर, सुहास साधना बहुळकर, स्वाती कांबळे, विलास गिते, श्रीधर अंभोरे उपस्थित होते. हजारे यांच्या हस्ते बहुळकर यांना र. बा. केळकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हजारे म्हणाले, आपण या देशाचे काही देणे लागतो, ही भावना लक्षात घेऊन प्रत्येकाने सर्वांना सामावून घेत मोठा प्रपंच करावा. माझे ते माझे दुसऱ्याचे तेही माझेच अशी प्रवृत्ती समाजात आज वाढत आहे. ती वाईट आहे. प्रमोद कांबळे नरेंद्र फिरोदिया यांनी स्वतःचा प्रपंच सांभाळून मोठा प्रपंच केला. त्यात सर्वांना सामावून घेतले. त्यामुळेच अशी देशस्तरावरील मोठी स्पर्धा येथे घडू शकली. सरकारला कला कलाकारांविषयी आस्था नाही. कलाकारांच्या अडचणींविषयी मी सरकारशी बोलेन, असे ते म्हणाले.

अभिनेते मनोज जोशी म्हणाले, चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांची देवता असलेल्या गणपतीच्या उत्सवात या स्पर्धेचे आयोजन ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कुठलाही राजाश्रय नसताना आयोजकांनी अशी स्पर्धा आयोजित केली, हे कौतुकास्पद आहे. अशी स्पर्धा मुंबईतही कधी झाली नाही.

कला संस्कृती हा प्रत्येक देशाचा कणा आहे. गायन, स्थापत्य, चित्र या सर्व कलांचा संगम मंदिरात असतो. देवानंतर कलेला मानले जाते. आजच्या यांत्रिक युगात संवेदना आणि जिवंतपणा देणारी देवानंतर कुठली गोष्ट असेल, तर ती कला आहे. कला कधीही मरणार नाही, ती श्रेष्ठ आहे. ब्रह्मानंतर जगात फक्त कलाकार असतो, कारण तो सगळ्या संवेदना, आत्मिक कायिक भावना वाचून कॅनव्हासवर उतरवतो, असे जोशी यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना बहुळकर म्हणाले, समाजातील विषमता, द्वेष, भांडण संपवायचे असेल, तर चित्रकलेचा र. बा. केळकरांनी केला तसा मोठा संसार करायला हवा. त्यामुळे प्रत्येकाचेच अंतःकरण विशाल होईल, कित्येक गोष्टी समजायला लागतील. त्यातूनच समाज बदलू शकेल.

ते पुढे म्हणाले, या स्पर्धेमुळे व्यक्तिचित्रणाचे नगर हे केंद्र होईल. पोट्रेट ही कला फोटोग्राफीमुळे मागे पडली असली, तरी फोटोग्राफी ही पोट्रेट होत नाही. कारण यात चित्रकाराची भावना आणि समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व साकारलेले असते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी सराव वाढवायला हवा, असे सांगितले. सराव वाढला म्हणजे आत्मविश्वास वाढतो. मग त्यातून अभिव्यक्ती येते, हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, असे बहुळकर म्हणाले. सूत्रसंचालन निनाद बेडेकर याने केले, तर आभार नरेंद्र फिरोदिया यांनी मानले.
सर्वांमध्येच दहा टक्के उपजत गुण
सर्वांमध्येच उपजत दहा टक्के गुण असतात. ते शंभर टक्के करणे हे ज्याच्या त्याच्या हातात असते. मग ते क्षेत्र कलेचे असो वा अन्य कुठले. व्यक्तीच्या मनात जे साधायचे असते त्याचा दृढ संकल्प असला, तर सर्व शक्य होते. आयुष्य एकदाचा मिळते. त्यामुळे वाईट गोष्टी करता जीवनाची मजा घेतली पाहिजे, असे चित्रकार अक्षयकुमार झा यांनी सांगितले.

र. बा. केळकर यांचे चित्र भेट
दिवंगत चित्रकार र. बा. केळकर यांचे नगरमधील त्या काळातील विद्यार्थी विनायक रसाळ यांनी केळकर स्वतः मॉडेल म्हणून बसले असताना १९६४ मध्ये काढलेले चित्र बहुळकर यांच्या हस्ते नरेंद्र फिरोदिया यांना दिले. बहुळकर यांच्या संस्थेला फिरोदिया यांनी तीन लाखांची देणगी दिली.
यांनी पटकावली पारितोषिके
व्यावसायिक गटात मनोज सकले (प्रथम), गणेश कळसकर (द्वितीय), गणेश हिरे (तृतीय), तर उत्तेजनार्थ पारितोषिक स्नेहल पागे, प्रमोद कुर्लेकर, अभिजित कांबळे यांना, तर विद्यार्थी गटात अमित दाणे (प्रथम), तुलसीदास सहारे (द्वितीय), प्रसाद थिटे (तृतीय), तर उत्तेजनार्थ गजानन शेळके, ओंकार मनकामे, नागेश ठोके यांना पारितोषिक मिळाले.
बातम्या आणखी आहेत...