आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाष्य: ‘खड्ड्यांचे शहर’ हा लोकभावनांचा जागर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरला ‘खड्ड्यांचे शहर’ म्हणून संबोधणे तसे अतिशय वेदनादायी आहे. पण, शहरातील नागरिकांच्या भावनाच तशा आहेत. त्यामुळे त्या व्यक्त करण्यासाठी आम्हाला नगरचा उल्लेख असा करणे भाग पडले आहे. ‘दिव्य मराठी’च्या टीमने नगर शहरात सर्वेक्षण केले असता शहर उपनगरांतील सर्व मुख्य अंतर्गत रस्त्यावर सुमारे आठ हजार सातशे खड्डे असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणे अशी आहेत, की जेथे खड्डे मोजणेही अशक्य होते, इतकी त्यांची संख्या अधिक आहे. रस्ते शहराच्या धमन्या असतात. त्यांची वर्षानुवर्षे चाळण होण्यास आतापर्यंतचे सर्व सत्ताधारी प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत.

नगर शहर राज्याच्या मध्यभागी आहे. विदर्भ मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे हे शहर आहे. खड्ड्यांमधून वाहन आदळायला लागले, की वाहन चालक समजतो, की नगर आले. या वाहन चालकांकडून नगर शहरातील खड्ड्यांच्या अपकीर्तीचा डिंडीम असा राज्यभर पसरत आहे. पण संबंधितांपैकी कोणालाही त्याची लाज-शरम वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या अपकीर्तीला महापालिके बरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागही तितकाच जबाबदार आहे. कारण अंतर्गत रस्त्यांबरोबरच शहरातून जाणारे महामार्गही तसेच उखडलेले आहेत.

या आधीही ‘दिव्य मराठी’ने सातत्याने खड्ड्यांची समस्या मांडली आहे. नगरच्या रस्त्यांवर आतापर्यंत दोनशे कोटींहून अधिक खर्च झाला आहे. नगर शहरात सुमारे ८५ किलोमीटर रस्ते आहेत. सध्या महामार्गाच्या दर्जाचा रस्ता तयार करण्यासाठी एका किलोमीटरमागे एक कोटी रुपयांचा खर्च येतो. म्हणजे शहरातील सर्व रस्ते फक्त ८५ कोटी रुपयांत चांगले दर्जेदार बनले असते. उर्वरित पैसा कोणाच्या खिशात गेला, याचा जाब संबंधितांना कोणी विचारला नाही. कारण सत्ता आलटून-पालटून बदलत राहिली आहे. या सर्वांच्याच दृष्टीने ‘खड्डे आमच्या सोयीचे’ ही भावना आहे. कारण नवीन रस्ता बनवण्यापेक्षा खड्डे बुजवण्यात मिळणारी मलई अधिक आहे. त्या मलईवर पोसलेली राजकीय नेतृत्वाची ठेकेदारी रस्त्यांच्या दुरवस्थेस कारणीभूत असल्याचे उघडपणे बोलले जाते. पण, नागरिकच अशा नागरिकांच्या प्रश्नी बेजबाबदार लोकांना वारंवार निवडून देत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ‘दिव्य मराठी’ने अतिशय आक्रमकपणे अनेकदा खड्ड्यांचा प्रश्न मांडल्यावर संबंधितांना त्याची शरम वाटून ते खड्डे बुजवण्याचे दर्जेदार काम करण्याची अपेक्षा होती. पण, ते कधीही झाले नाही. याचे कारण मलईखोरी. महापालिका नागरिकांना सुविधा देण्यासाठी आहे का, असा प्रश्न पडण्याची सध्याची स्थिती आहे.

सर्वाधिक वर्दळीच्या लालटाकी रस्त्याचा भाग असलेल्या सिद्धिबागेसमोर रस्त्याची दुरुस्ती झाल्यावर लगेच १५ दिवसांनी तेथे दुसऱ्यांदा काम करावे लागले, यावरून महापालिकेचा कारभार कसा ठेकेदाराच्या हितासाठी चालतो, हे स्पष्ट व्हावे. नगरमध्ये महापौर निवडीच्या वेळी नगरसेवकांची जी पळवापळवी पैशांच्या महापूर वाहतो, तो नागरी सुविधांच्या दर्जावर परिणाम करतो. विशेष म्हणजे, नागरिकांना प्रचंड त्रास होऊनही नगर शहराची अब्रू या खड्ड्यांमुळे वेशीवर टांगली जाऊनही काहीही होत नाही. बहुसंख्य निरोगी धडधाकट नागरिकांनाही खड्ड्यांमुळे हाडांची कायमची दुखणी जडली आहे, तरीही खड्ड्यांबद्दल सर्वच राजकीय पक्षांचा जाणिवा बोथट झाल्याचे सध्याचे चित्र आहे. ते नागरिकांच्या भावना संतप्त करणारे आहे. खड्ड्यांना जबाबदार असलेले नेतृत्व अधिकारी यांच्या दृष्टीने सुदैवाची बाब म्हणजे त्याविरुद्ध रस्त्यावर येण्याची नगरकरांची परंपरा नाही. त्यामुळे आता आम्हालाच आता वेगळी भूमिका घ्यावी लागत आहे. नगरला खड्ड्यांचे शहर म्हणणे, हे दूषण देणे असले, तरी नागरिकांच्या प्रश्नांवर झोपलेल्यांना उठवण्यासाठीचा तो एक जागर आहे. शहरातील नागरिकांच्या भावनाच आम्ही या अंकात व्यक्त करत आहोत.
बातम्या आणखी आहेत...