आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धन: शहा डोंगरावर पशुपक्ष्यांसाठी बांधले तीस कृत्रिम पाणवठे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नैसर्गिक साधनसंपत्तीची मनमुराद लयलूट करणारे समाजात हजारोंच्या संख्येने असतात. पण, निसर्गाचे आपण काही देणे लागतो, निसर्गातील परावलंबी असलेल्या जीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी करणारे फार थोडे. असेच वेगळे कार्य नगरच्या डॉ. अनिरुद्ध व ऊर्मिला गिते या दाम्पत्याने केले आहे. पशुपक्ष्यांसाठी त्यांनी शहा डोंगरावरील चांदबिबी महाल परिसरात स्वखर्चाने तीस कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. नद्या, नाले व तळी आटली आहेत. पाण्याअभावी वन्यजीव तळमळत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे डॉ. गिते दाम्पत्याला पाहवले नाही. वैद्यकीय पेशाशी प्रामाणिक राहून रुग्णांची जशी सेवा करतो, तसे पशु-पक्ष्यांसाठीही काहीतरी करण्याचे त्यांनी ठरवले.

रोज सकाळी पाथर्डी रस्त्यावरील शहा डोंगरावर फिरायला जाणे हा या दाम्पत्याचा नित्यक्रम. या टेकडीवर पशू-पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे डॉ. गिते दाम्पत्याने या परिसरात पाणवठे तयार करण्याचा मनसुबा आखला. स्वत:च्या मारुती झेन मोटारीतून त्यांनी विटा, वाळू, सिमेंट असे साहित्य डोंगरावर नेले. पाणवठे बांधण्यासाठी त्यांनी गवंड्याला विनंती केली. महालावर जाण्याच्या रस्त्यावर चहाच्या टपरीजवळ, रस्त्याच्या कडेला, भिंतीवर असे ठिकठिकाणी एकूण तीस पाणवठे तयार करण्यात आले. या पाणवठय़ांवर आता विविध पक्षी, खारी, तसेच हरीण, ससे असे प्राणी पाणी प्यायला येतात.


जीवसृष्टी वाचवण्याचे समाधान
निसर्गाचेही आपण काही देणे लागतो, या भावनेतून चांदबिबी महालाच्या परिसरात पाणवठे बांधण्याचे ठरवले. या पाणवठय़ांवर तहान भागवायला पशू-पक्षी येतात हे पाहून बरे वाटते. पाणवठय़ांमुळे थोड्या प्रमाणात का होईना जीवसृष्टी वाचली, याचे समाधान आहे. या पाणवठय़ांमध्ये कधी-कधी शेवाळ साचते. आठ दिवसांतून एकदा हे पाणवठे आम्ही स्वच्छ करतो.’’ डॉ. अनिरुद्ध गिते, बालरोग तज्ज्ञ, नगर