आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात भरउन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुळानगर पम्पिंग स्टेशनवर ४०० अश्वशक्तीचे विद्युत पंप बसवण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पंप बसवण्यासाठी शनिवारी दिवसभर मुळानगर विळद येथून होणारा पाणी उपसा बंद ठेवण्यात आला. परिणामी शहर उपनगरांना शनिवारी रविवारी उशिरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे नगरकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मनपाच्या या नियोजनशून्य कारभाराने नागरिक संतापले आहेत.

शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुळानगर येथे ४०० अश्वशक्तीचे दोन पंप बसवण्याचे काम सुरू आहे. जुने पंप काढणे, नवीन पंप बसवणे, नवीन पंपांसाठी लागणारा वीजपुरवठा जोडणे, त्याची चाचणी अशी कारणे पुढे करत मनपा शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित करत आहे. पंप बसवण्याची ही कार्यवाही दीड महिन्यापासून सुरू आहे. महापौर अभिषेक कळमकर यांनी काही दिवसांपूर्वी मुळानगर येथील पम्पिंग स्टेशनची पाहणी केली होती. जास्त अश्वशक्तीचे विद्युत पंप बसवून शहराला आठ दिवसांत पुरेसे जास्त दाबाने पाणी मिळेल, असे आश्वासन त्यावेळी त्यांनी दिले होते. परंतु महिना उलटला, तरी शहराला पुरेसे पाणी मिळालेले नाही. उलट आहे तोच पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी मुळानगर येथे पंप बसवण्याच्या नावाखाली पुन्हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी शहरात गेल्या तीन दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी योजनेवरील दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे पाणीउपसा करता येणार नाही. परिणामी शहराला अमुक दिवशी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे प्रसिद्धिपत्रक मनपा प्रशासनाकडून वारंवार काढण्यात येते. सर्वच नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याचा संदेश पोहोचत नाही. त्यामुळे नियोजित वेळेत पाणी येणार की नाही, याबाबत नागरिकांना काहीच माहिती नसते. ऐनवेळी नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते. मनपाने हा नियोजनशून्य कारभार बंद करावा, अशी नगरकरांची अपेक्षा आहे.

पर्यायी यंत्रणाच नाही
शहराचीतहान चार दशके जुन्या पाणी योजनेच्या माध्यमातून भागवली जात आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांसह पाणी उपसा करणारी यंत्रणेला अक्षरश: गंज चढला आहे. वीजपुरवठा खंडित होणे, जलवाहिनी फुटणे हे प्रकार नित्याचेच आहेत. अशा वेळी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडे सक्षम पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. नवीन शहर सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे कामही गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराला पुरेसे पाणी मिळेल, परंतु त्यासाठी आणखी काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, यासाठी मनपाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

४८ हजार अधिकृत नळजोड
४.५० लाख शहराची लोकसंख्या

शटडाऊनमुळे पुरवठा खंडित
शहरपाणी योजनेवरील वीजपुरवठा पाच मिनिटांसाठी जरी खंडित झाला, तरी त्याचा परिणाम पाणीउपशावर होतो. खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला तरी मुळानगर विळद येथून होणारा पाणीउपसा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी महापालिका महावितरण कंपनीला जबाबदार धरते. महावितरणचे अधिकारी मात्र यात आमचा काहीच दोष नसल्याचे सांगतात. मनपाने पम्पिंग स्टेशनवर कॅपॅसिटर बसवून घ्यावेत, जेणेकरून विजेचा पुरवठा कमी-जास्त होऊन तो खंडित होणार नाही. परंतु मनपाने महावितरणच्या या सल्ल्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे.

टँकरसाठी लागतात पैसे
शहरातीलज्या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशा भागात महापालिकेने स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु असे होत नसल्याने शहराच्या विविध भागातील नागरिकांना पाचशे ते हजार रुपये खर्चून पाण्याचे टँकर मागवावा लागत आहे. कल्याण रस्ता, सारसनगर, केडगाव, बोल्हेगाव अशा विविध भागात आजही महापालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाही. असे असतानाही येथील नागरिक मालमत्ता करासह दीड हजारांची नियमित पाणीपट्टी भरतात. मनपा प्रशासनाने योग्य नियोजन करून पुरेसे पाणी द्यावे, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रामाणिक अपेक्षा आहे.