आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: अवघ्या साडेचार वर्षांच्या आरूषच्या चित्रांचे येत्या रविवारी प्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालचित्रकार आरूष. - Divya Marathi
बालचित्रकार आरूष.
नगर - अवघ्या साडेचार वर्षांच्या आरूष राहूल गिरमकर या चिमुकल्याने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन येत्या रविवारी (५ मार्च) सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकात भरवण्यात येणार आहे. आकार ग्रूपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उदघाटन झी टीव्हीवरील आर्ट रूम विथ लालोन या कार्यक्रमाचे सादरकर्ते लालोन (अभिजीत पॉल) यांच्या हस्ते रविवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. 
 
वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आरूषने चित्र काढायला सुरूवात केली. लहानपणी कधीतरी त्याने भिंतीवर रेषा ओढायला प्रारंभ केला. रागावण्याऐवजी आईने त्याच्या हातात पेस्टल खडू आणि कोरे कागद दिले. आरूष त्यात रमायला लागला. कुत्रा, कावळा, मुंग्या, कोंबडा अशा साध्या साध्या विषयांवर त्याने काढलेली चित्रं खूप बोलकी आहेत. टीव्हीचा रिमोट आणि मोबाइलवरील गेम्सऐवजी तो या चित्रांमध्ये रमलेला असतो. 

आरूषच्या या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून सगळ्याच पालकांचा आपल्या मुलांमधील कलागुणांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, असा प्रयत्न आरूषचे आजोबा, ज्येष्ठ चित्रकार रवींद्र सातपुते यांचा आहे. प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी आरूषच्या चित्रांतील वेगळेपण ओळखून त्याला प्रोत्साहन दिले. आता ही चित्रे सगळ्यांना पाहता येणार आहेत. 

या प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभास पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार आभा भागवत उपस्थित राहणार असून त्या पालकांशी संवाद साधणार आहेत. रेखाटनकार श्रीधर अंभोरे, प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे, शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, पुण्यातील बालाजी वाघमारे, गिरमिट अॅनिमेशन स्टुडिओचे युवा चित्रकार यावेळी उपस्थित असतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चैत्राली जावळे करणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती आरूषची आई प्राजक्ता विल राहुल गिरमकर यांनी दिली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...