आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरे-जावयाचा फैसला मंगळवारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अशोक लांडे खूनप्रकरणातील आरोपी संदीप, सचिन, अमोल कोतकर व वाहनचालक अजय गायकवाड यांच्या जामीन अर्जावर सर्वाेच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ती मंगळवारी (24 जानेवारी) होणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि संदीप कोतकरचे सासरे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीही त्याच दिवशी औरंगाबाद खंडपीठात होणार आहे. सासरे-जावयाच्या जामीन अर्जाचा फैसला एकाच दिवशी होणार आहे.
कोतकरपुत्रांसह त्यांच्या वाहनचालकाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अल्तमास कबीर व जे. चलोमेश्वर यांच्या पीठापुढे होणार होती. परंतु या पीठापुढे अन्य प्रकरणे प्रलंबित असल्याने कोतकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. आता ही सुनावणी 24 जानेवारीला होईल. कडिर्ले यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीही 24 लाच होणार आहे.
कोतकरपुत्रांना सर्वाेच्च न्यायालयात जामीन मिळतो की नाही, याबाबत उत्सुकता आहे. निर्णय लांबणीवर पडल्याने उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.
कर्डिले येरवड्यात, कोतकर ससूनमध्ये - येरवडा कारागृहात असलेले आमदार कर्डिले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्डिले तेथे जिल्हा परिषद निवडणुकीतील इच्छुकांच्या भेटीगाठी घेत असल्याचे वृत्त एका वाहिनीने प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली. त्यामुळे गुरुवारी सकाळी कर्डिले यांची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली. त्यापूर्वीच लांडे खून प्रकरणातील आरोपी व कर्डिले यांचे व्याही भानुदास कोतकर याला डायबेटीसचा त्रास वाढल्याने येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.