आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागताध्यक्ष करंडक ‘असो’ ने पटकावला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नगर शाखेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्वागताध्यक्ष एकांकिका करंडक स्पर्धेत डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक ग्रुपने सादर केलेल्या असो या एकांकिकेने पटकावला. द्वितीयस्थानी जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या गोंद्या व कमुचा फार्स, तर तृतीयस्थानी नगरच्या हाऊसफु ल्ल नाट्य संस्थेचे झुम बराबर झुम व चतुर्थस्थानी नगरच्याच सेव्हंथ डायमेन्शनने सादर केलेल्या ये साली जिंदगी या एकांकिकेने पटकावला. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे व महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते अनुक्रमे 11 हजार, 7 हजार, 5 हजार व 2 हजार रुपये पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
खासदार दिलीप गांधी यांच्या गौरवार्थ या करंडकाचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षक म्हणून गजानन गोखले व सविता खुंटाळे यांनी काम पाहिले.
यावेळी मोरे म्हणाले, एकांकिकेच्या माध्यमातूनच चांगले कलाकार निर्माण होत असून, अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या एकांकिकेतून आपणास जीवन जगण्याची उभारी मिळाला असून, राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मजल मारू शकलो. पुणे- मुंबईपेक्षा नगरमध्येच ख-या अर्थाने नाट्य चळवळीचे काम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात नाट्य परिषदेचे नगर शाखाध्यक्ष सतीश शिंगटे यांनी पुढील वर्षी या स्पर्धेचे 10 वे वर्र्ष असून, हा दशकपूर्ती सोहळा वैशिष्ट्यपूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन सागर मेहेत्रे यांनी, तर शशिकांत नजान यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी चेतन गाडे, अ‍ॅड. शिवाजी कराळे, रूपाली देशमुख, शेखर वाघ, रवी गुंजाळ, अच्युत देशमुख, अमोल खोले, रितेश साळुंके, प्रसाद बेडेकर आदींनी परिश्रम घेतले.
महापौर निवासाचा निधी नाट्यसंकुलासाठी - दिग्दर्शक मोरे यांनी नगरमध्ये नाट्य चळवळ मोठ्या प्रमाणात असतानाही नाट्यसंकुल नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर महापौर शिंदे यांनी नगरच्या नाट्य संकुलासाठी महापालिका विशेष प्रयत्न करीत असून महापौर निवासाचा सुमारे अडीच कोटींचा निधी नाट्यसंकुल उभारणीसाठी वळवण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याच्या कामास प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अनिल कोठारी यांनी संकुलासाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.