आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Election Campaign In Ahmednagar District

सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचार पोहोचला शिगेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शाब्दिक शस्त्र परजून ठेवली आहेत. प्रचाराच्या तोफा सोमवारी (13 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. त्यानंतर मात्र उमेदवार अथवा राजकीय पक्षांना जाहीर सभा, पदयात्रा, मेळावे घेता येणार नसल्याने पडद्यामागून प्रचाराची सूत्रे हलतील. प्रत्येक क्षणाचा वापर करून घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्ते उतावीळ आहेत. मतदानासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रविवार (13 ऑक्टोबर) सुटीचा दिवस असल्याने हा प्रचाराचा दिवस ठरणार आहे.
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (15 ऑक्टोबर) मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे. प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने शनिवारी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत प्रचार केला. उमेदवारांनी वैयक्तिक भेटी-गाठी, मोबाइलवरून एसएमएस, रिक्षाद्वारे प्रचार, प्रचार फे-या यावर जोर दिला आहे. रविवारी सुटी असल्याने हा दिवस ख-या अर्थाने प्रचाराला दिवस ठरणार आहे. जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत चौरंगी व पंचरंगी लढती होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व मनसे या पाच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशा रंगणार लढती
अकोले : अशोक भांगरे (भाजप), मधुकर तळपाडे (शिवसेना), वैभव पिचड (राष्ट्रवादी), सतीश भांगरे (काँग्रेस) व नामदेव भांगरे (माकप) संगमनेर : बाळासाहेब थोरात (काँग्रेस), आबासाहेब थोरात (राष्ट्रवादी), जनार्धन आहेर (शिवसेना), प्रकाश आहेर (बसप), राजेश चौधरी (भाजप) शिर्डी : अभय शेळके (शिवसेना), राजेंद्र गोंदकर (भाजप), राधाकृष्ण विखे (काँग्रेस), शेखर बो-हाडे (राष्ट्रवादी) यांच्यात सामना होणार आहे.कोपरगावमध्ये आशुतोष काळे (शिवसेना), नितीन औताडे (काँग्रेस), स्नेहलता कोल्हे (भाजप),अशोक गायकवाड (राष्ट्रवादी) श्रीरामपूर : लहू कानडे (शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), सुनीता गायकवाड (राष्ट्रवादी), भाऊसाहेब वाकचौरे (भाजप) यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या मतदारसंघात तब्बल 15 उमेदवार रिंगणात आहेत. नेवासे : शंकरराव गडाख (राष्ट्रवादी), बाळासाहेब मुरकुटे (भाजप), दिलीप वाकचौरे (काँग्रेस), दिलीप मोटे (मनसे) व साहेबराव घाडगे (शिवसेना) यांच्यात लढत होणार आहे. शेवगाव : पाथर्डीत मोनिका राजळे (भाजप), चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी), अजय रक्ताटे (काँग्रेस), देविदास खेडकर (मनसे), बाबासाहेब ढाकणे (शिवसेना) राहुरीत अमोल जाधव (काँग्रेस), उषा तनपुरे (शिवसेना), शिवाजी कर्डिले (भाजप), शिवाजी गाडे (काँग्रेस). पारनेर : विजय औटी (शिवसेना), शिवाजी जाधव (काँग्रेस), बाबासाहेब तांबे (भाजप), मोहन रांधवन (मनसे), सुजित झावरे (राष्ट्रवादी) नगर मतदारसंघात अनिल राठोड (शिवसेना), अभय आगरकर (भाजप), सत्यजित तांबे (काँग्रेस), संग्राम जगताप (राष्ट्रवादी). श्रीगोंदे : शशिकांत गाडे (शिवसेना), राहुल जगताप (राष्ट्रवादी), बबनराव पाचपुते (भाजप), हेमंत ओगले (काँग्रेस) यांच्यात सामना होईल. कर्जत-जामखेड : राम शिंदे (भाजप), प्रा. किरण ठोंबे (काँग्रेस), रमेश खाडे (शिवसेना), जयसिंग फाळके (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होणार आहे.
जिल्ह्यात 32 लाख 43 हजार मतदार 53 मतदार आहेत.त्यात महिला मतदार 15 लाख19 हजार 102 महिला मतदार व 16 लाख 85 हजार 166 पुरुष मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण 3 हजार 593 मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, सोमवारी मतदारसंघात मतदानयंत्र जाणार आहे. नगर मतदार संघात मतदाराने ज्या उमेदवारास मते दिली त्याची खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव दलाला पाचारण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 138 उमेदवार
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत प्रमुख पक्षांसह अपक्ष असे 138 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य बुधवारी (१५ ऑक्टोबर) मतदान यंत्रात बंद होणार आहे. प्रमुख लढती काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यात होणार असल्या, तरी शेवगाव-पाथर्डी, नेवासे, पारनेर या तीन मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे करून या चार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.

प्रचाराचा धूमधडाका
विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या 15 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, फे-या, पदयात्रा, मेळावे सुरू झाल्याने प्रचारात खरा रंग भरला गेला. शहरांसह गावांतील गल्लीगल्लीत प्रचाराची वाहने फिरू लागल्याने वातावरण राजकीय बनून गेले आहे. या प्रचाराचा धूमधडाका सोमवारी थंडावणार आहे. त्यानंतर उमेदवार, राजकीय पक्षांना जाहीर सभा, पदयात्रा, मेळावे घेता येणार नसल्याने पडद्यामागून प्रचाराची सूत्रे हलतील.

प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बारा विधानसभा मतदारसंघांत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बारा निवडणूक निर्णय अधिकारी व बारा सहायक निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्ह्यात 11 मतदान केंद्र अतिसंवेदनशील व 42 मतदान केंद्र संवेदशील आहेत. असे एकूण 53 संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सुक्ष्म निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर शहरातील माळीवाडा (177) मतदान केंद्राचा अतिसंवेदनशील मतदान केंद्रामध्ये समावेश आहे. या सर्वच मतदान केंद्रावरील मतदानाचे चित्रीकरण होणार आहे.