आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीगोंदे मतदारसंघावर आता शिवसेनेचाही दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपऐवजी शिवसेनेला मिळावी, यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप-शिवसेना युती अस्तित्वात आल्यापासून श्रीगोंदे मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपतर्फे आतापर्यंत बापूसाहेब जामदार, राजाभाऊ झरकर, घनश्याम शेलार, कैलास शेवाळे, शेतकरी संघटना पुरस्कृत अनिल घनवट आणि राजेंद्र नागवडे या नेत्यांनी श्रीगोंदे विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. दरवेळेस नवीन चेहरा देऊनही भाजपला गेल्या सहा निवडणुकीत यशाच्या जवळही जाता आले नाही. या सहा निवडणुकीत भाजपतर्फे सर्वाधिक त्रेपन्न हजार मते राजेंद्र नागवडे (2009 मध्ये) यांनी मिळवली होती, तर सर्वात कमी सहा हजार मते बापूसाहेब जामदार यांना (1990) मिळाली होती.
हा संदर्भ विचारात घेता भाजपला सहा वेळा अपयश आले म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा व त्या बदल्यात नगर जिल्ह्यातील अन्य एखादा मतदारसंघ भाजपला द्यावा, असा प्रस्ताव युतीच्या वरिष्ठ नेत्यांपुढे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी मांडला आहे. हा प्रस्ताव मांडण्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे अग्रेसर आहेत. गाडे यांनी श्रीगोंदे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मतदारसंघ बदलाबाबत काय निर्णय होतो, याबाबत उत्सुकता आहे.
मतदारसंघ बदलला; अनेकांचा अपेक्षा भंग?
विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला, तर आमदारकीवर डोळा ठेवून भाजपमध्ये जाणा-या अनेक नेत्यांची गोची होण्याचा धोका आहे. यापूर्वी 2004 मध्ये भाजपमध्ये दाखल झालेल्या कुंडलिकराव जगताप यांना श्रीगोंद्याची जागा शेतकरी संघटनेला दिल्याने थांबावे लागले होते. यंदा शिवसेनेने श्रीगोंदे मतदारसंघावर दावा सांगितल्याने दहा वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होते की काय याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
राजू शेट्टींशी नाहाटांनी केली गुप्त चर्चा
श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांच्याशी मुंबईत गुप्त चर्चा केल्याची माहिती आहे. श्रीगोंदे मतदारसंघ भाजप-शिवसेनेऐवजी महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला, तर आपण निवडणूक रिंगणात उतरू, असे नाहाटा यांनी शेट्टींना सुचवल्याचे समजते. नाहाटा यांनी या भेटीला दुजोरा दिला असला, तरी चर्चेचा तपशील नंतर सांगू असे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.