आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections In Ahmednagar District, Latest News In Divya Marathi

जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महायुती, तसेच आघाडीत फाटाफूट झाल्याने प्रचाराची राळ उडवण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना चांगलीच धावाधाव करावी लागली. काही मतदारसंघात पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने संबंधित उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागली. मागील पंधरा दिवसांपासून धडाडणा-या जाहीर प्रचाराच्या तोफा सोमवारी (13 ऑक्टोबर) सायंकाळी थंडावणार आहेत.
कधी नव्हे ते यंदा विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. शेवटच्या क्षणी आघाडी व युतीत फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पारनेर मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजी जाधव यांनी मैदानातून पळ काढल्याचा अपवाद वगळता इतर सर्वच पक्षांचे उमेदवार जीव तोडून निवडणुकीची खिंड लढवत आहेत. बारा मतदारसंघांत एकूण 138 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अपक्षांचा प्रचार त्यांच्या कुवतीनुसार सुरू आहे. विरोधी उमेदवारांची मते खाणाऱ्या अपक्षाला बळ देण्याचे प्रयत्नही सर्वच मतदारसंघांत होताना दिसत आहेत.
बुधवारी (15 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावतील. अधिकृत प्रचार संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचाराला जोर येणार आहे. श्रीगोंदे, कोपरगाव, श्रीरामपूर या तीन मतदारसंघांत सर्वाधिक 15, त्याखालोखाल पारनेरमधून 14, राहुरीतून 12, नगर शहर, कर्जत-जामखेड, नेवासे, शेवगाव मतदारसंघात प्रत्येकी 11, संगमनेरमधून 10 , शिर्डीतून 8 व अकोल्यात 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
शरद पवार आज श्रीगोंद्यात
श्रीगोंदे मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (13 ऑक्टोबर) श्रीगोंदे येथे सकाळी अकरा वाजता जाहीर सभा होणार आहे.
सोमवार, मंगळवार "कत्तल की रात'
सोमवारी सायंकाळपर्यंतचा वेळ जाहीर प्रचारासाठी हाती आहे. त्यानंतर रात्री साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर होण्याची शक्यता आहे. निवडणूक यंत्रणेला चकवा देऊन मते पक्की करण्यासाठीच्या घडामोडी या काळात होतील. त्यासाठी काही उमेदवारांनी खास कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे.