आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक येताच उगवली विकासवादाची भूछत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शहराच्या विकासाचे उमाळे फोडत "विकासवादी' भूछत्रांचे अमाप पीक येत आहे. सोशल मीडियातून फैलावलेले हे पीक फलकांच्या माध्यमातून डोके वर काढत आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विविध प्रश्नांवर झोपा काढणारे आता दबावगटाच्या नावाखाली शहरविकासाच्या गप्पा मारत संधिसाधूपणा करत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात हे घडत आहे.
शहर विकासासाठी दबावगट म्हणून काम करण्यात संस्था, संघटना यांची भूमिका महत्त्वाची असते. "आम्ही नगरकर' या संघटनेने विविध प्रश्नांवर रस्त्यावर येत किमान वाहतुकीसंदर्भात सुधारणा व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. मात्र, विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच विकासाची फुटकळ भूमिका मांडत सोशल मीडियावर "विकासवाद्यां'ची भूछत्रे मोठ्या संख्येने उगवत आहेत. शहराचा विकास रखडण्यात आमदार अनिल राठोड यांना जबाबदार धरून जनमत त्यांच्या विरोधात जाईल, यासाठी सोशल मीडियातून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या २५ वर्षांत साडेचार वर्षे सत्ताधारी आमदार व त्यातील काही काळ राज्यमंत्री म्हणून राठोड यांनी काम केले. तथापि, राठोड यांनी शहरासाठी काहीच केले नाही, असे सांगण्याचा प्रयत्न विकासवाद्यांकडून सुरू आहे.
स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला गेल्या पाच वर्षांपासून वाकुल्या दाखवणाऱ्या चेतक एंटरप्रायजेस या ठेकेदाराला वठणीवर आणण्यासाठी आता विकासाची भूमिका मांडणारे कधीही पुढे आले नाहीत. सत्ताधारी पक्षासह काही संघटनांनीही उड्डाणपुलासाठी आंदोलने केली. मात्र, सत्ताधाऱ्यांची मर्जी संपादन करत ठेकेदाराने अजून काम सुरू केलेले नाही.
जिल्ह्यात तीन-तीन कॅबिनेट मंत्री असतानाही नगर-शिरूर रस्ता चौपदरीकरणाच्या निविदेत समाविष्ट असलेला एक उड्डाणपूल बांधून घेण्यात सर्वांनाच अपयश आले. शिरूरचे तत्कालीन आमदार बाबुराव पाचरणे यांनी निविदेत समावेश नसतानाही ठेकेदाराकडून तीन भुयारी मार्ग तयार करून घेतले. मात्र, नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचे घोंगडे भिजत ठेवण्यात ठेकेदाराला यश आले. यासाठी जिल्ह्यातील मंत्रीही तितकेच जबाबदार आहेत.

वाहतूक, पार्किंग, अतिक्रमणे या समस्या सोडवण्यासाठी दबावगट म्हणून आवाज उठवणाऱ्या शहरातील तथाकथित एक-दोन संघटना वगळता सर्वच स्तरावरून गांभीर्याचा अभाव आहे. आता निवडणुकीच्या रणधुमाळीत विकासाची संधिसाधू भूमिका मांडत सोशल मीडियावर झळकणाऱ्या विकासवाद्यांना मतदार कितपत साथ देतात, याबाबत साशंकता आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करून आपापल्या नेत्यांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात या विकासवाद्यांची भर पडली आहे.
हा तर संधिसाधू पुढारी व सुपारीबहाद्दरांचा रिकामा उद्योग
पाच वर्षांत कधी त्यांना विकासाची भूमिका मांडावी वाटली नाही किंवा शहराच्या विकासासाठी भांडणाऱ्यांच्या मागे उभे राहण्याची गरज वाटली नाही. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कुणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन त्यांचा हा कार्यक्रम सुरू आहे. संबंधित उमेदवार अशा सुपारीबहाद्दरांना पुढे करून संधिसाधूपणा करत आहेत. दबावगटासाठी बुद्धी व शक्ती लागते, तसेच प्रामाणिक इच्छाशक्ती व राजकारणविरहीत भूमिका आवश्यक आहे. हे निकष पूर्ण करतो का, याचे संबंधितांनी आत्मपरीक्षण करावे.'' शशिकांत चंगेडे, सामाजिक कार्यकर्ते.

चिखलफेकीसाठीही वापर
जुने संदर्भ नव्याने टाकत विरोधी उमेदवारांबाबत गैरसमज पसरतील, असे संदेश सोशल मीडियातून सध्या तुरळक प्रमाणात दिसत आहेत. प्रचाराचा जोर वाढला की, असे संदेश मोठ्या प्रमाणात येतील. बदनामी करणाऱ्यांपर्यंत पोलिस पोहोचण्यापूर्वीच मतदान संपलेले असेल. आपापल्या उमेदवारांची प्रतिमा उजळ करताना विरोधी उमेदवारांवर चिखलफेक करण्याचे प्रकार यावेळी वाढणार आहेत.