आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

सभेला गर्दी जमवण्याचे उमेदवारांपुढे आव्हान, ज्येष्ठ नेत्यांवर चौकसभा घेण्याची आली वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागला आहे. राज्य व राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या प्रचारसभा जिल्ह्यात होऊ लागल्या आहेत. चौरंगी व काही ठिकाणी होत असलेल्या पंचरंगी लढतींमुळे नेत्यांच्या सभांना होणा-या गर्दीत मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे या नेत्यांना चौकसभांवर समाधान मानावे लागत आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्य व राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या सभांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी जिल्ह्याचा दौरा केला. दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या दौऱ्याचे नियोजन झाले असले, तरी अद्याप त्यांच्या सभा झालेल्या नाहीत. माजी पालकमंत्री मधुकर पिचड हे अकोले मतदारसंघात अडकून पडले आहेत. या मतदारसंघाचे सलग सातवेळा प्रतिनिधीत्व केल्यानंतर आता त्यांनी मुलगा वैभव यांना रिंगणात उतरवले आहे. त्याला निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार, आर. आर. पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे, जयंत पाटील यांच्या सभांचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे.
काँग्रेसच्या प्रचाराची मदार माजी मंत्री राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. मात्र, ते आपापल्या मतदारसंघांतच सध्या व्यग्र आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांच्यासह पक्षाध्यक्ष सोनिया व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचार सभांचे नियोजन सुरू आहे.

उमेदवारांची संख्या अधिक असल्याने सर्वच पक्षांचे नेते जास्तीत जास्त सभा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या सभांना होणाऱ्या गर्दीत यावेळी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही समस्या लक्षात घेऊनच फडणवीस यांची सभा माळीवाड्यासारख्या ठिकाणी घेण्याची वेळ शहर भाजपवर आली. सभेला उपस्थितीही जेमतेमच होती. तत्पूर्वी गडकरी यांच्या अकोले येथे झालेल्या सभेलाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बेलवंडी येथील त्यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्याकरिता उमेदवार बबनराव पाचपुते यांना बरीच धावाधाव करावी लागली. तशीच परिस्थिती शरद पवार यांच्या शहरातील सभेबाबतही झाली. सर्वच उमेदवार व पक्षांना जाहीर प्रचारसभांना गर्दी जमवण्याचे आव्हान सतावत आहे.
दिग्गजांचीही कोंडी
चारही पक्षांचे नेते आपापल्या मतदारसंघांत गुंतले आहेत. महायुती व आघाडीत झालेल्या फाटाफुटीचा फटका बसू नये, याची चिंता त्यांना सतावत आहे. प्रचाराची मुख्य मदार राष्ट्रीय नेतृत्वावरच आहे. शिवसेनेत उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचाराचा भार आहे. नेत्यांच्या सभा घेताना गर्दीचेही आव्हान पेलावे लागेल.
प्रचारफे-यांवर भर
उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारफेऱ्यांवर अधिक भर देत आहेत. शहरातील विविध प्रभागांत सकाळ-संध्याकाळ फे-या काढून उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांना साद घालत आहेत. ग्रामीण भागात वैयक्तिकरित्या पोहोचून, तसेच गावपुढाऱ्यांना हाताशी धरून सध्या प्रचार सुरू आहे.