आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीत प्रभावी उमेदवार शोधण्याची भाजपवर वेळ; विधानसभेसाठी अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या बालेकिल्ल्यातच प्रभावी उमेदवार शोधण्याची भाजपवर वेळ आली आहे. संघाची टीम मतदारसंघात सध्या चाचपणी करीत आहे. काही इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली असली, तरी ऐनवेळी राजकीय चमत्कार घडण्याची शक्यता आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या दृष्टीने राजकीय मावशीचा हा मतदारसंघ. तालुक्यातील भगवानगड हा ‘मुंडेगड’ म्हणून राजकीय प्रभाव गाजवू लागला, अशी टीका होत असतानाही मुंडे यांनी त्याकडे कधी लक्ष दिले नाही. ‘मुंडे यांनी शब्द दिला होता’, असे एकच वाक्य उच्चारत अनेक इच्छुक आचारसंहिता जारी होईपर्यंत तुणतुणे वाजवत राहतील. आमदार चंद्रशेखर घुले किंवा माजी आमदार नरेंद्र घुले यांच्यासारख्या खंबीर उमेदवाराला तोंड देण्यासाठी भाजपकडे तशा नेत्यांची वानवा आहे. ‘मुंडे लाट’ मुंडे असताना जेवढी प्रभावी होती, तेवढी आता प्रभावी राहील का, याचा विश्वास खुद्द इच्छुक उमेदवारांना नाही. केवळ पूर्व भागातील म्हणून उमेदवारी असा निकष लावून श्रेष्ठींकडे हेलपाटे मारणारे अजून स्वत:ला ओळखायला तयार नाहीत. मुंडेंनी दिलेला शब्द मतदारांना पटला, तर कमळाचे बटण दबेल, अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. ऐनवेळची तडजोड म्हणून माघार घ्यावी लागली, तर काही इच्छुकांनी मुंडेंकडे परळी, मुंबई व दिल्लीत जाऊन शब्द घेतल्या दिवसांपासून तारीखनिहाय खर्च टिपून ठेवण्यामागे कोणते शास्त्र आहे, याचा निसटता अंदाज येत नाही. खासदार दिलीप गांधी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सर्व्हेक्षण करणा-या संघाच्या यंत्रणेकडून समजली.
अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी पक्ष सोडला असला, तरी त्यांना आपला हितचिंतक मानणा-यांची संख्या अजून भाजपमधून कमी झाली नाही. वरवर गांधी फॅक्टर व आतून ढाकणे फॅक्टर अशी दुहेरी निष्ठा दाखवत काहींनी मुंबई गाठली. कुणाचेही रंजन करायचे नाही, असा ढाकणेंचा पवित्रा असूनही जुन्या ओळखीने वशिला लावा, म्हणत नगरच्या गुलमोहोर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी वेगवेगळी कारणे सांगत इच्छुकांनी चाचपणी केली आहे. बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता सी. डी. फकीर, उद्योजक भीमराव फुंदे आदींसह आठ-दहा नावे चर्चेत आहेत. फकीर यांना गांधी, मुंडे गटाचा पाठिंबा आहे. थेट ‘गडकरी कनेक्शन’ अशी ओळख असल्याने उमेदवारी मिळालीच, तर सर्वात अगोदर त्यांना भगवानगडाचे आशीर्वाद आवश्यक ठरणार आहेत. सर्व थरांत त्यांचा प्रभावी संपर्क व जातीय राजकारणाबाहेरील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना पाठिंबा मिळत असला, तरी ‘आरएसएस फॅक्टर’ कुणाच्याही नावावर समाधानी नाही. येत्या पंधरा तारखेपर्यंत काहीही राजकीय चमत्कार घडू शकतो, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटतो. दहा तारखेपर्यंत आरएसएसचा अहवाल जाऊन कुणाला जागृत, अन् कुणाला ‘प्राप्त वरान नि बोधत’ असा आदेश मिळतो, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर मोनिका राजळे भाजपकडून इच्छुक
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे यांचे माहेरच्या नात्याने मुंडे घराण्याशी असलेले संबंध लक्षात घेता आमदार पंकजा मुंडे यांची त्यांच्या उमेदवारीबाबत सहानुभूती आहे. नाशिक दौ-यात मुंडे यांनी राजळे यांचा बायोडाटा पूर्णपणे वाचून ती प्रत स्वत:च्या रेकॉर्डमध्ये ठेवली. मात्र, राजळे गटाकडून कसलाही दुजोरा मिळत नाही. सोशल मीडियावर मात्र मोनिका राजळे यांच्या बाजूला कमळाचे चित्र दाखवत चर्चेला उधाण आले आहे.