आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेस एकत्र येणार, पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडून नव्या पदाधिका-यांची निवड करताना काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. मुंबईत पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी पालकमंत्री पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला बरोबर घेऊन जिल्हा परिषदेत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, आमदार शंकरराव गडाख, आमदार अरुण जगताप, आमदार चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते. पक्षांतर्गत आघाडी करण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यात काँग्रेसला २८, तर राष्ट्रवादीला ३२ जागा मिळाल्या होत्या. भाजप व शिवसेनेला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या होत्या. राज्यात व केंद्रात दोन्ही काँग्रेस एकत्र असल्याने त्याचवेळी जिल्हा परिषदेतही दोन्ही काँग्रेस एकत्र येतील असे वाटत होते. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने भाजपला महिला व बालकल्याण, तर शिवसेनेला कृषी व पशूसंवर्धन समिती देण्याची तडजोड करून सत्ता स्थापन केली. २१ मार्च २०१२ रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ लंघे यांच्या गळ्यात पडली, तर उपाध्यक्षपदी मोनिका राजळे यांची निवड करण्यात आली.लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे सत्तेतील भागीदार दोन्ही काँग्रेसच्या विरोधात होते. राष्ट्रवादीने भाजप व शिवसेनेला जवळ केल्याचा फटका काही प्रमाणात लोकसभा निवडणुकीत बसला, असे काँग्रेसच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला सामोरे जात असताना राष्ट्रवादीने भाजप व शिवसेनेशी केलेली युती तोडावी, अशी मागणी काँग्रेसच्या केंद्र व राज्य सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी केली होती.
विद्यमान अध्यक्ष लंघे यांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला संपणार असून २१ ला नव्या निवडी होणार आहेत. अशा स्थितीत विनाविलंब दुरुस्ती करून दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याची गरज व्यक्त होत होती. सदस्य सत्यजित तांबे यांनीही राष्ट्रवादीबरोबर आघाडीला तयार असल्याचे सांगितले होते. शनिवारी राष्ट्रवादीकडून आघाडीसाठी तयारी दर्शवण्यात आली. राष्ट्रवादीकडे ३२ सदस्य असल्याने त्यांचा अध्यक्षपदासाठी दावा असणार आहे, पण ऐनवेळी यात बदलही होऊ शकतो. दोन दिवसांत काँग्रेसबरोबर बैठक घेऊन आघाडीचा अंतिम निर्णय समन्वयातून घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून समजले. राष्ट्रवादीने बैठक घेऊन आघाडीचा घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी आता एकत्र बसून चर्चा करायला हवी. बबनराव पाचपुते आता भाजपकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांना मानणारे सदस्य यावेळी कोणती भूमिका घेणार हेही पहावे लागेल.'' विनायक देशमुख, काँग्रेस पदाधिकारी
राज्यात कोल्हापूर, उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील सत्तेत काँग्रेसने राष्ट्रवादीला डावलले आहे. त्यामुळे तेथे दुरुस्त्या करा, नगरमध्ये आम्ही करतो, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. परंतु मुंबईच्या बैठकीत राष्ट्रवादीने नगरमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील इतर आघाड्यांचे काय? याबाबत सध्यातरी गोपनीयता पाळण्यात येत आहे.