आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्ठावंतांना उमेदवारी द्या; अन्यथा मी अपक्ष लढेन, शिवसेनेचे शशिकांत गाडे यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- श्रीगोंदे मतदारसंघ जरी भारतीय जनता पक्षाकडे असला, तरी त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी किंवा हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा. भाजपने बबनराव पाचपुतेंना उमेदवारी दिल्यास ते कदापि मान्य होणार नाही. उमेदवार बदला; अन्यथा मी अपक्ष उभा राहीन, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी वाळकी येथील मेळाव्यात दिला.
श्रीगोंदे मतदारसंघात शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, याविषयी विचारमंथन करण्यासाठी रविवारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख संदेश कार्ले, नंदू ताडे, सभापती सुनीता नेटके, युवा सेनेचे धनंजय गाडे, महिला आघाडीच्या सुजाता कदम, कारखान्याचे संचालक हरिभाऊ निकम, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय सदाफुले, शारदा भिंगारदिवे, पोपट पुंड, विश्वास जाधव, शंकर ढगे, मोहन बोठे, नामदेव भालसिंग आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना गाडे यांनी श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांवर घणाघाती टीका केली. पाचपुते, नागवडे आणि जगताप हे तिघेही दुसऱ्याचे कारखाने काटा मारत असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात तेच काटा मारतात. प्रत्येक कारखाना महिन्याला सहा हजार टनांपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची लूट करतो, असे ते म्हणाले.
सन १९८० पूर्वी यांची आर्थिक स्थिती काय होती आणि आता काय आहे? यांचे महाल कसे उभे रहातात? हे नक्की कोणता व्यवसाय करतात हे त्यांनी सांगावे. दूध व्यवसायातूनही ते शेतकऱ्यांची लूट करतात. कमावलेले कोट्यवधी रुपये मग निवडणुकीत वापरतात, असा आरोप त्यांनी केला. आपण साकळाई योजनेसाठी मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढला होता, पण अनेक वर्षे सत्ता उपभोगूनही सत्ताधाऱ्यांना साकळाई योजना करता आली नाही. उसाचे पाणी कुसळाला जाऊ देणार नाही, अशी वल्गना पाचपुतेंनी केली होती. आता कुसळांची ताकद त्यांना दाखवून द्यावी लागेल. पाचपुतेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच ते केले होते. भाजपच्या दरबारात आता पाचपुते निर्दोष वाटत असतील, तरी जनतेच्या दरबारात ते भ्रष्टाचारीच आहेत. त्यांना कदापि माफी नाही, असे गाडे म्हणाले. नगर तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत झाला नाही. मग आमदार म्हणून पाचपुते काय करत होते, असा परखड प्रश्नही गाडे यांनी या वेळी केला. वेळप्रसंगी भगवा गळ्यात घालूनच अपक्ष उमेदवारी करू, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
पाचपुतेंचा नजराणा
बबनराव पाचपुतेंनी पांडुरंग बदलला, पण कोणता नजराणा दिल्याने नवा पांडुरंग पावला हे त्यांनी जाहीर करावे. पाचपुते आणि कर्डिले दोघेही आमदार झाले, तर कर्डिलेंना मंत्रिपद मिळणे शक्य नाही. त्यामुळे कर्डिलेंना मंत्रिपदापर्यंत पोहोचायचे असेल, तर पाचपुतेंना पाडावेच लागेल, असे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे म्हणाले.