आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवकांनी फिरवली महापालिकेकडे पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. काही महत्त्वाच्या विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडली आहे. अनेक कर्मचारी कार्यालयात केवळ सह्या करण्यापुरतीच हजेरी लावतात.
महापालिकेची निवडणूक होऊन नऊ महिने झाले आहेत. त्यानंतर लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापािलकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी ३४ प्रभागांतून निवडून दिलेले ६८ नगरसेवक आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. आचारसंहिता लागू होताच शिवसेनेचे आमदार अनिल राठोड नगरसेवकांसह घरोघरी जाऊन प्रचार करू लागले आहेत. राष्ट्रवादीचे महापौर संग्राम जगताप हेदेखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी मागील तीन-चार दिवसांपासून प्रचार सुरू केला आहे. भाजप व काँग्रेसचे नगरसेवक मात्र अद्याप प्रचारापासून अलिप्त आहेत. असे असले, तरी त्यांनीही महापालिकेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महापािलकेचे कामकाज सध्या तरी प्रशासनाच्याच भरवशावर सुरू आहे.
उपायुक्त भालचंद्र बेहेरे आठ-दहा दिवसांच्या रजेवर आहेत. आयुक्त विजय कुलकर्णी व सामान्य प्रशासनाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांच्यावरच सध्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी आहे. उपायुक्त चारठाणकर यांनी पदभार घेताच १९ लेटलतिफ कर्मचा-यांवर कारवाई केली होती. परंतु बहुतेक कर्मचा-यांना आता या कारवाईचा विसर पडला आहे. आचारसंहितेचा फायदा घेत अनेक कर्मचारी केवळ सही करण्यापुरतेच कार्यालयात हजेरी लावत आहेत. आचारसंहितेमुळे काही महत्त्वाची विकासकामे लांबणीवर पडली आहेत. केडगाव पाणी योजनेंतर्गत नवीन नळजोडणीच्या कामासाठी निविदा मागवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत बुरुडगाव येथे खत प्रकल्प सुरू करण्यासाठी देखील निविदा मागवण्यात येणार होती; परंतु आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. नगरसेवक महापालिकेत फिरकत नसल्याने प्रशासकीय स्तरावरील काही निर्णय प्रलंबित आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत म्हणजे किमान महिनाभर महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांत भर पडणार आहे.

अधिका-यांचे दुर्लक्ष
महापौरपदाचा कार्यभार स्वीकारताच संग्राम जगताप यांनी नागरी समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी अधिका-यांसह विविध भागात प्रत्यक्ष भेटीची मोहीम सुरू केली. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या सुटल्या. मात्र, आता खुद्द महापौरच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने नागरी समस्यांकडे अधिका-यांची पुन्हा दुर्लक्ष झाले आहे. महापौरांसह नगरसेवक सध्या प्रचारात व्यग्र असल्याने व अधिकारी-कर्मचारी दाद देत नसल्याने तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.