आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्षम उमेदवारांसाठी सर्वच पक्षांची दमछाक, इच्छुक व बंडखोरांचे घोडे अखेर गंगेत न्हाले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युती व आघाडी फुटल्याने चारही पक्षांची सक्षम उमेदवार शोधताना पुरती दमछाक उडाली आहे. मित्रपक्षांच्या मतदारसंघात संघटनात्मक बांधणीचा अभाव व कमी ताकद, तसेच उमेदवार निवडीसाठी अवघ्या काही तासांचा मिळालेला अवधी यामुळे सर्वच पक्षांची त्रेधातिरपीट उडाली.
पूर्वी मित्रपक्षाच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार शोधण्याचे आव्हान चारही पक्षांसमोर आले. रात्रीतच पक्षाचे निरीक्षक ज्या-त्या जिल्ह्यातील पक्षाचे नेते उमेदवार शोधाच्या कामाला लागले. युतीच्या जागावाटपात जिल्ह्यातील बारापैकी सात मतदारसंघ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वाट्याला, तर उर्वरित पाच मतदारसंघ काँग्रेस व भाजपच्या वाट्याला होते. शिवसेनेला ऐनवेळी श्रीगोंदे, जामखेड-कर्जत, शेवगाव-पाथर्डी, राहुरी व नेवासे मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ आली. भाजपला नगर, पारनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर व अकोले मतदारसंघात उमेदवार शोधावे लागले. राष्ट्रवादीने नगरसाठी पूर्वीच उमेदवार निश्चित केला होता. उर्वरित कर्जत-जामखेड, शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेरमध्ये उमेदवारांसाठी धावाधाव करावी लागली. काँग्रेसला पारनेर, श्रीगोंदे, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, नेवासे, कोपरगाव व संगमनेरसाठी उमेदवारांचा शोध घ्यावा लागला.