आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाव पुढा-यांचा वाढला भाव, गावनिहाय कार्यकर्त्यांची यादी तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-विधानसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांसमोर निवडून येण्याचे मोठे आव्हान आहे. प्रचारासाठी कमी दिवस हातात असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे उमेदवारांनी गाव पुढाऱ्यांकडेच फिल्डिंग लावण्याची युक्ती शोधली आहे. त्यामुळे या पुढाऱ्यांचा भाव चांगलाच वाढला आहे.
उमेदवारी यादी जाहीर करण्यास सर्वच पक्षांना विलंब झाला. काही उमेदवारांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा ए. बी. फॉर्म मिळाला. त्यामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. जिल्ह्यातील बारा मतदारसंघांसाठी 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बुधवारी (1 ऑक्टोबर) माघारीची मुदत आहे. त्याच दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचाराची नेमकी दिशा ठरवली जाईल. उमेदवारांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. त्यातच भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या सर्व प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नियोजन कसे आखायचे याच चिंतेने उमेदवार हैराण झाले आहेत.
ग्रामपंचायत कुणाच्या ताब्यात आहे, याचा शोध घेऊन संबंधित गाव पुढाऱ्यांच्या भेटीगाठीला आता वेग आला आहे. पुढाऱ्याला भेटून आम्हाला मदत करा, असे साकडे घातले जात आहे. पुढारी कोणत्या पक्षाचा, हा विचार बाजूला ठेवून सर्व उमेदवारांनी अशा भेटींवर भर दिला आहे. नक्कीच मदत करू' असे आश्वासन गावातील पुढारी उमेदवारांना देत आहेत. जिल्ह्याच्या उत्तर भागात हा प्रकार जोरात सुरू आहे. याचा फायदा किती उमेदवारांना होईल, हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. मतदारसंघातील जिल्हा परिषद गटांची संख्या व तेथील सदस्य यांच्याही भेटीगाठी घेतल्या जात आहेत. गावपातळीवर यंत्रणा तैनात करण्यासाठी नातीगोती जुळवून गणित आखले जात आहे. विरोधकांच्या रणनितीवर लक्ष ठेवून एक पाऊल पुढे टाकण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे.

निष्ठावंत सैरभैर
निष्ठावंतांना पक्षाने डावलल्यामुळे त्यांनी दुस-या पक्षाचा झेंडा हातात घेऊन निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. जुन्या पक्षाबरोबर थांबायचे की, उमेदवारीसाठी बदललेल्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. तथापि, उमेदवारांनी हक्काच्या कार्यकर्त्यांना जवळ ठेवण्यात यश मिळवल्याचे प्रचारात दिसत आहे.
तरुण मंडळांची यादी
राहुरी, कर्जत-जामखेड, श्रीगोंदे या मतदारसंघांत दिग्गज रिंगणात असून येथे रंगतदार लढती पहायला मिळतील. प्रचार यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी गावातील लहान-मोठ्या तरुण मंडळांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जास्तीत जास्त तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी गावनिहाय सक्रिय नेत्याची निवड करण्यात आली आहे.