आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकीसाठी शड्डू ठोकणारे झाले गार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे-विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आमदारकीसाठी शड्डू ठोकून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणा-या नऊजणांचे अवसान निवडणूक रिंगणात गळून पडले आहे. आव्हान देणा-यांचा फुसका बार हा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
उमेदवारीसाठी सर्वाधिक चुरस भाजपमध्ये होती. काष्टीच्या सुवर्णा पाचपुते त्यात आघाडीवर होत्या. जाहिरातबाजी करून आमदार होण्याची त्यांना घाई झाली होती. निवडणुकीपूर्वीच "इव्हेंट गुरू'ची त्यांनी मदत घेऊन स्वत:चे नाव चर्चेत ठेवले होते. अर्ज बाद झाल्याने त्यांचे हसू झाले. भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी तर भाजपला आपल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांना अर्जच भरला नाही. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रेय हिरणवाळे यांनी आपणच कसे भाजपचे एकमेव निष्ठावंत असून, उमेदवारीसाठी पात्र असल्याचे श्रेष्ठींना वदवून सांगितले होते. त्यांनीदेखील उमेदवारी दाखलच केली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेले निकटचे संबंध सांगून आपणच भाजपचे तारणहार होऊ शकतो, असे सांगणारे दादाराम ढवाण रणांगण सोडून बाहेर गेले. गोपीनाथ मुंडे यांची मरणोत्तर साक्ष काढून त्यांनी आपल्याला कसा शब्द दिला होता याची चर्चा करणारे संतोष लगड यांनी आता आमदार बबनराव पाचपुतेंचे सारथ्य सुरू केले आहे.
काँग्रेसकडून उमेदवारीसाठी सर्वात पात्र असल्याचे दाखवणाऱ्या अनुराधा नागवडे यांना तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचेही भान राहिले नाही. तीच अवस्था जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलारांची. एकवेळ काँग्रेसकडे उमेदवारीसाठी भांडणारे हे नेते आता काँग्रेसची उमेदवारी हेमंत ओगले या नवख्या तरुणाच्या गळ्यात पडल्याने पक्षाच्या प्रचारात कोणती भूमिका घेतात, हे लवकरच कळेल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडून भाजपकडे उमेदवारीची फिल्डिंग लावलेले घनश्याम शेलार यांनी उमेदवारीच दाखल न करता रिंगणातून "एक्झिट' घेतली. राष्ट्रवादी सोडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्याच वर्तुळात त्यांचा वावर पुन्हा सुरू झाला आहे. काँग्रेससोडून राष्ट्रवादी समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळवलेले बाळासाहेब नाहाटा हेदेखील आमदारकी लढवण्यावर ठाम होते. प्रत्यक्षात त्यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांपुढे जाहीर केले. राणाभीमदेवी थाटात प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणाऱ्या या नेत्यांची मागील दोन महिन्यांतील भाषा पाहिली, तर म्यानातून तलवार काढण्यापूर्वीच शत्रूला चारीमुंड्या चीत करण्याचा त्यांचा अविर्भाव होता. या आव्हानवीरांची म्यानच रिकामी असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून आले.
नागवडेंशिवाय होणारी पहिली निवडणूक
1977 पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव नागवडे केंद्रस्थानी असत. सन 1995 मध्ये नागवडे उमेदवार नव्हते. मात्र, बाबासाहेब भोस यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे मात्र त्यांच्याच हाती होती. मागील वेळी राजेंद्र नागवडे रिंगणात होते. यंदाच्या निवडणुकीत नागवडे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती रिंगणात व केंद्रस्थानी नसण्याची 1977 नंतर ही पहिलीच वेळ आहे.