आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्लेदारांसाठी यंदा निवडणूक झाली सोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युती व आघाडी फुटल्याने जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत प्रमुख चार पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील मतदारसंघ प्रस्थापितांचे बालेकिल्ले बनले आहेत. या वेळीही विरोधी मतांच्या विभागणीचा फायदा या किल्लेदारांना मिळणार असल्याने त्यांच्यासाठी निवडणूक सोपी बनल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, त्यांच्या मताधिक्क्यात चांगलीच घट होणार आहे.
चार महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकरा विधानसभा मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना भरभरून मताधिक्य मिळाले. स्थानिक उमेदवार असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांना त्यांच्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात थोडेफार मताधिक्य मिळाले होते. मात्र, नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांचा दोन लाख मतांच्या फरकाने पराभव झाला. मोदी लाटेबरोबरच अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला. तत्पूर्वी सन 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना व भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली होती.
एकास एक निवडणूक झाल्यास थोडेफार फेरबदल यावेळच्या निवडणुकीतून अपेक्षित होते. मात्र,युती व आघाडीत झालेली ताटातूट प्रस्थापितांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे.
नगर : शिवसेनेचे अनिल राठोड गेल्या २५ वर्षांपासून शहराचे प्रतिनिधित्व करत आहेत. काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्यावर बाहेरच्या उमेदवाराचा शिक्का आहे, तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप व भाजपचे अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यातील मतविभाजनाचा फायदा राठोड यांना मिळेल.
श्रीगोंदे : एक अपवाद वगळता बबनराव पाचपुते सहावेळा विधानसभेत गेले आहेत. प्रत्येक वेळी वेगळ्या चिन्हाची परंपरा कायम राखत ते या वेळी भाजपच्या तिकिटावर उमेदवारी करत आहेत. शरद पवार यांनी एकास-एक लढत घडवण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. राष्ट्रवादीचे राहुल जगताप, काँग्रेसचे हेमंत उगले, शिवसेनेचे शशिकांत गाडे यांच्यात होणारे मतविभाजन पाचपुतेंच्या पथ्यावर पडणार आहे.
शेवगाव-पाथर्डी : विद्यमान आमदार चंद्रशेखर घुले राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. गेल्या वेळी त्यांनी 20 हजारांच्या मताधिक्याने निवडणूक जिंकली होती. भाजपकडून शिवाजीराव काकडे यांना उमेदवारी हवी होती. मात्र, राष्ट्रवादीतून आयात केलेल्या मोनिका राजळे यांना भाजपने मैदानात उतरवले. काकडे गटाची नाराजी, काँग्रेसचे अजय रक्ताटे, सेनेचे बाबासाहेब ढाकणे व मनसेच्या देवीदास खेडकर यांच्यातील मतविभागणीचा लाभ घुले यांना मिळणार आहे.
शिर्डी : हा मतदारसंघ राधाकृष्ण विखे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यांनी 1995 पासून चारही निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्षांची गर्दी आहे. विरोधी मतांती विभागणी विखेंसाठी सोयीची ठरेल.
संगमनेर : बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला आहे. पक्षातील स्थान उंचावताना त्यांनी मतदारसंघात संपर्कही सातत्याने वाढवला आहे. सन 1985 पासून सातत्याने ते विजयी झाले आहेत. ते या वेळी सातव्यांदा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेससाठी जिल्ह्यातील सर्वाधिक सुरक्षित असलेली ही एकमेव जागा. गेल्या वेळी थोरात 55 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. या वेळी मताधिक्यात घट येण्याची शक्यता आहे.

दोन आमदारांची विश्रांती
अकोले मतदारसंघात 1980 पासून निवडून येण्याची परंपरा मधुकर पिचड यांनी राखली होती. या वेळी त्यांचा मुलगा वैभव पिचड रिंगणात आहे. शिवसेना, काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांशी त्यांचा सामना होणार आहे. पिचड स्वत: उमेदवार नसताना कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे. कोपरगाव मतदारसंघात विद्यमान आमदार अशोक काळे यांनीही आपला मुलगा आशुतोष काळे यांना रिंगणात उतरवले आहे. काळे यांचे परंपरागत विरोधक असलेल्या कोल्हे कुटुंबीयाकडून स्नेहलता कोल्हे रिंगणात आहेत. मात्र, यावेळी राष्ट्रवादीची साथ सोडून कोल्हे यांनी भाजपचे कमळ जवळ केले आहे. कर्जत-जामखेडमध्ये गेल्या चार, तर राहुरीत गेल्या दोन निवडणुकांत भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. नेवासे मतदारसंघही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शंकरराव गडाख यावेळी दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. पारनेर मतदारसंघात आमदार विजय औटी यापूर्वी दोनदा निवडून आले.