आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांसाठी आता रात्र थोडी, सोंगे फार, मतदारांपर्यंत जाण्यासाठी धावाधाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील बारा मतदारसंघात 138 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून जाहीर प्रचारासाठी आता त्यांच्याकडे अवघ्या दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. उमेदवारांच्या अधिक संख्येने सर्वच मतदारसंघातील लढतीत तीव्र चुरस निर्माण झाली आहे. परिणामी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. तसेच स्टार प्रचारकांच्या सभा होण्यासाठीही "फिल्डिंग' लावण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी या वेळी पहिल्यांदाच राज्यभरात एकाच दिवशी 15 ऑक्टोबरला मतदान होत आहे. प्रचाराची मुदत 13 ऑक्टोबरला संपणार आहे. युती व आघाडी टिकून राहील, हा आशावाद संपुष्टात येण्यास बराच कालावधी गेल्याने अनेकांचे पक्षीय उमेदवारीचे स्वप्न सत्यात उतरले. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याचे सोपस्कार उरकल्यानंतर प्रचारासाठी त्यांना अवघ्या दोन आठवड्यांचाच कालावधी मिळाला आहे. भौगोलिक परिस्थिताचा विचार करता सर्वाधिक लहान मतदारसंघ हा नगर शहर आहे. उर्वरित सर्वच मतदारसंघ मोठे आहेत. त्यामुळे श्रीगोंदा, राहुरी, शेवगाव मतदारसंघ विविध तालुक्यांत पसरलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील सर्वच मतदारांपर्यंत पोहोचणे अशक्य बनले आहे. मतदारांची संख्या अधिक असणाऱ्या गावांना उमेदवारांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. मागच्या वेळी मताधिक्य मिळालेल्या गावांवर अधिक लक्ष केंद्रित करून गावपुढा-यांना हाताशी धरून प्रचाराची धुरा त्यांच्या हाती सोपवण्यात येत आहे. "रात्र थोडी अन् सोंगे फार' अशी उमेदवारांची परिस्थिती झाली आहे.
शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचे चार उमेदवार सर्वच मतदारसंघात आमने-सामने आहेत. या प्रमुख उमेदवारांसह मनसे, भाकप, बसपा आदी पक्षांचे उमेदवार विविध मतदारसंघांत रिंगणात आहेत. आघाडी व युतीमुळे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये पक्षीय उमेदवारांची संख्या मर्यादित असायची. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करण्याची कसरत करताना उमेदवार आपापल्या पक्षातील स्टार प्रचारकांच्या प्रचारसभा मतदारसंघात व्हाव्यात यासाठी फिल्डिंग लावत आहेत. चारही पक्षातील राज्यस्तरावरील स्टार प्रचारक त्यांच्या मतदारसंघात स्वत:चे अस्तित्व जपण्यासाठी गुंतून पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या सभा मिळवण्यासाठी अधिक खटाटोप करावा लागत आहे.
'पालिका निवडणूक' चित्र
सर्वच मतदारसंघात पाचपेक्षा अधिक उमेदवार असल्याने प्रचारातील रंगत वाढली आहे. एका उमेदवाराची प्रचारफेरी अथवा प्रचाराचे वाहन गेले की विरोधी उमेदवाराचे फेरी अथवा वाहन पोहोचते. एकावेळी वििवध उमेदवारांचे प्रचार सुरू आहेत. त्यामुळे पालिका, ग्रामपंचायत निवडणुकीचा अनुभव मतदारांना येत आहे.
अनुभवाचा फायदा
दोन अपवाद वगळता उर्वरित सर्वच विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अपवाद असलेल्या दोन मतदारसंघातही आमदारपुत्र मैदानात आहेत. सर्वच विद्यमान आमदारांकडे मागच्या निवडणूका जिंकण्याचा अनुभव आहे. त्यांच्याव्यतिरिक्त रिंगणात असणा-या इतर उमेदवारांची अधिक दमछाक होत आहे.