आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या निवडणुकीत देशाच्या बाता; जिव्हाळ्याच्या स्थानिक मुद्यांना मात्र बगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांचे जिव्हाळ्याचे स्थानिक मुद्दे गायब झाले आहेत. स्टार प्रचारकांकडून केवळ राष्ट्रीय मुद्दे व युती-आघाडी तुटण्याचे खापर परस्परांवर फोडण्याची स्पर्धा सध्या सुरू आहे. जिल्हा गेल्या पाचपैकी चार वर्षे भीषण दुष्काळाच्या छायेतून जात आहे. शेती, सिंचन, उद्योग, तसेच विकासाच्या मुद्द्यांना बगल देऊन स्टार प्रचारक सवंग बोलण्यावर अधिक भर देत आहेत. याचा विपरित परिणाम जाणवण्याची जास्त शक्यता आहे.
यावर्षी जिल्ह्यात तब्बल दोन महिने विलंबाने पाऊस आला. तथापि, उशिराने का होईना पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास भरली आहेत. मात्र, लाभक्षेत्रात जेमतेमच पाऊस झाला. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने आता शेतातील उभी पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात झालेली तुफान गारपीट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली. तत्पूर्वीही तीन वर्षे दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागला. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यावर जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झाला. शेतकऱ्यांच्या या मोठ्या प्रश्नावर कोणताही बडा नेता काही बोलायला तयार नाही. केवळ आपापल्या पक्ष व उमेदवारांचे गुणगाण गाण्यात धन्यता मानली जात आहे. शेतकऱ्यांचा कळवळा असणारे नेतेही मोदी सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना नुकसान
झाल्याचे सांगत मताची बिदागी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
समन्यायी पाणीवाटप धोरण पुढे करून जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणातील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे पळवले जात आहे.
न्यायालयाच्या माध्यमातून उभारलेला लढाही कामाला आलेला नाही. जल प्राधिकरणाच्या आदेशानुसार जायकवाडीला पाणी देण्याची वेळ आली आहे. सिंचनासाठीचे पाणी जायकवाडीला जात असल्याने लाभक्षेत्रातील शेती धोक्यात येत आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणताही पक्ष अथवा स्टार प्रचारक तोंड उघडायला तयार नाहीत. नगर शहरासह जिल्ह्यातील इतर शहरांच्या मूलभूत गरजा, विकास, उद्योगांना बळ, बेरोजगारांचे प्रश्न, नगर शहराचा पर्यटन विकास आदी मुद्द्यांवर स्टार प्रचारकांनी भूमिका मांडावी, ही अपेक्षा आतापर्यंत फोल ठरली आहे. शेवटच्या टप्प्यात तरी जिव्हाळ्याचे विषय यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रचाराला मतदार वैतागले
लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर लढवली गेली. त्यामुळे महायुतीला मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न प्रभावी ठरणार आहेत. राष्ट्रीय मुद्दे व भावनिकतेला हात घालून सुरू असलेल्या प्रचाराला मतदार चांगलेच वैतागल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक व जिव्हाळ्याच्या प्रश्नांना महत्त्व आले आहे.