आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा विरोधकांकडे नाही- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतीय जनता पक्षासह काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही लायक चेहरा नाही. तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय? धरणे भरणारा, की दिल्लीपुढे शेपूट हलवणारा, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधकांवर हल्लाबोल केला.
शहर व जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गांधी मैदानात घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी सुहास सामंत, अनिल राठोड, विजय औटी, साहेबराव घाडगे, लहू कानडे, शशिकांत गाडे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. करे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे वस्त्रहरण झाले. आता त्यांचे पुन्हा वस्त्रहरण करायचे असेल, तर अगोदर त्यांना कपडे घालावे लागतील. भाजपचीही तशीच अवस्था आहे. या तिन्ही पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. काँग्रेस व भाजपकडे दिल्लीपुढे शेपूट हलवणारेच लोक आहेत. आता तर त्यांना शेपूट हलवण्यासाठीदेखील परवानगी घ्यावी लागते, अशा खिल्ली ठाकरे यांनी उडवली.
महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे युती तुटल्याचे दु:ख नाही. शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांनी कधीच विचार सोडले नाहीत. भाजपच्या नव्या पिढीने मात्र स्वार्थासाठी २५ वर्षांची युती तोडली. युती तोडली म्हणजे त्यांनी हिंदुत्वाशी नाते तोडले आहे. पूर्वीचे भगवे कमळ आता भगवे राहिले नसून ते आता पांढरे झाले आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. पंधरा वर्षे सत्तेत राहिलेले दोन्ही काँग्रेस व शिवसेनेच्याच बळावर केंंद्रात सत्तेवर असलेले भाजपवाले आता महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी फौज घेऊन येत आहेत. अफजल खानाच्या नावाची टोपी मी भिरकावली, परंतु त्यात भाजपने डोकं घातले, यात माझी काय चूक आहे? असे ठाकरे म्हणाले.

निष्ठावंतांची फौज केवळ शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेचे उमेदवारही सर्वसामान्य जनतेमधील आहेत. त्यामुळे मतदान करताना उमेदवारांचा विचार न करता केवळ धनुष्यबाणच पहा, पुढची जबाबदारी मी घेतो, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

शिवजयंती साजरी केली का?
भाजपवाल्यांनी कधी शिवजयंती साजरी केली का? असा सवाल ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी "नाही' असे उत्तर दिले. मग यांना आत्ताच छत्रपती कसे आठवले? छत्रपतींच्या नावाचा वापर करण्यासाठी आता भाजपवाले रायगडासह सर्व किल्ल्यांवर जातील, असेही ठाकरे म्हणाले.
नगर-पुणे रेल्वेमार्ग करणार
राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास नगर-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करू, शालेय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देऊ. सर्व काही तयार आहे. तुम्हीच ठरवा तुम्हाला काय हवंय, असे ठाकरे म्हणाले.
दिल्लीपुढे झुकणार नाही
महाराष्ट्र हे शिवरायांचे राज्य आहे. त्यामुळे दिल्लीत कितीही शहा असले, तरी त्यांच्यापुढे झुकणार नाही. भाजपच्या अटी मान्य केल्या असत्या, तर दिल्लीपुढे हुजरेगिरी करावी लागली असती. हे जनतेला मान्य झाले असते का? सत्तेच्या लालसेपोटी सेनेची कत्तल होऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.