आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार प्रचारकांची सुरू झाली वर्दळ, शेवटच्या टप्प्यात प्रचाराची उठणार राळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जाहीर प्रचाराला अवघ्या आठवडा उरला असताना हेलिकॉप्टरची घरघर वाढली आहे. प्रमुख पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या जिल्ह्यात सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (9 ऑक्टोबर) राहुरीत सभा होणार असून इतर पक्षांचे मातब्बर नेतेही रणधुमाळीत उतरले आहेत.जाहीर प्रचार 13 ऑक्टोबरला संपणार आहे. कितीही धावपळ केली, तरी सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना शक्य नाही. त्यामुळे बड्या नेत्यांच्या सभांसाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. एखादी तरी सभा व्हावी, यासाठी उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे यांच्या सभा झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी सभा झाली. आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांच्या सभा अद्याप झालेल्या नाहीत. त्यांच्या सभांचे नियोजन सुरू असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. भाजपचे एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्याही सभा झालेल्या नाहीत. या आठवड्यात त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. मनसेचे अवघे तीन उमेदवार रिंगणात असल्याने राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता नाही.
काँग्रेसची मदार स्थानिक नेतृत्वावर
काँग्रेसच्या प्रचाराची जिल्ह्यातील मदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्यावरच आहे. या दोघांशिवाय इतर कोणत्याही बड्या नेत्यांच्या सभा अजून जिल्ह्यात झाल्या नाहीत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी किंवा उपाध्यक्ष राहुल गांधी यांची एखादी सभा जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्यांच्या सभेबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.