आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या व तिस-या फळीतील कार्यकर्त्यांचा भाव वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात सर्व मतदारसंघांत चौरंगी-पंचरंगी लढती होत आहेत. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा भाव अचानक वधारला आहे. मात्र त्यामुळे पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
पहिल्या फळीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून दुसऱ्या अन‌् तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते सध्या रूबाबात फिरत आहेत.तालुका पातळीवरील पुढारी जेव्हा गावात येतात, तेव्हा पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या घरी त्यांची उठबस असते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन होते. प्रचाराच्या गाड्याही पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या नावानेच येतात. पहिल्या फळीतील कार्यकर्ता पुढच्या सीटवर, तर दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते मागे बसतात. मान असतो तो फक्त पहिल्या फळीतील कार्यकर्त्याला, नाव घेतले जाते ते फक्त पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांचे. मात्र, बेंबीच्या देठाला रग लागेपर्यंत ओरडून घोषणाबाजी, जय हो म्हणतात ते दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्तेच.

मतदानाच्या दिवशीही पहिल्या फळीतील कार्यकर्ते ओट्यावर बसून असतात. मात्र, धावपळ करत मतदान गोळा करतात दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतीलच कार्यकर्ते. शेवटी राबराब राबूनही नाव होते ते पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांचे. पण या निवडणुकीत हे चित्र बदलले आहे. सर्वच मतदारसंघात चौरंगी-पंचरंगी लढती होत असल्याने उमेदवारांची कमतरता नाही. शिवाय सर्व उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्याला आपली पत बदलण्याचा रस्ता मिळाला आहे. आलेल्या संधीचा फायदा घेत या कार्यकर्त्यांनी आता आपल्या स्थानात वृध्दी करत पहिल्या फळीपर्यंत मजल मारली आहे. या कार्यकर्त्यांना आता प्रचार करण्यासाठी चारचाकी गाड्या देण्यात आल्या आहेत. जे कार्यकर्ते कधी गाडीच्या मागच्या सीटवर बसत होते ते आता पुढच्या सीटवर बसून प्रचार करत आहेत. एवढेच नव्हे, तर पूर्वीच्या गावातील प्रमुखाच्या समोरून रूबाबात गाडी फिरवत आहे. हे पाहून पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या अंगाचा मात्र तिळपापड होत आहे.