आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औटी-शिवसेनेतील कटुतेचा इतरांना लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पारनेरचे आमदार विजय औटी व नगर तालुक्यातील शिवसैनिकांत मोठी दरी आहे. या कटुतेतूनच दीड महिन्यापूर्वी विकासकामांच्या फलकांवरील आमदार विजय औटींच्या नावाला काळे फासण्यात आले होते. शशिकांत गाडे यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाले. पण अद्यापही शिवसैनिक औटींच्या प्रचारापासून दूर आहेत. औटी व शिवसैनिकांतील दुही अपक्ष उमेदवार माधवराव लामखडे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
नगर तालुक्यातील 47 गावे पारनेर मतदारसंघाला जोडलेली आहेत. या भागात सुमारे 93 हजार मतदार आहेत. या 47 गावांमध्ये शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत याच भागात औटींना 16 हजार मतांची निर्णायक आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या भागात शिवसेनेने आपले प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. औटींनी या भागात मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत, पण पक्षसंघटनेबरोबर त्यांचे सूत काही जुळलेले नाही. या भागात शिवसेनेचे प्रस्थ वाढत असताना त्याला खीळ घालण्याचे काम औटींनी केले, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. औटींनी या भागात आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी ज्यांना ताकद दिली त्यांचे व शिवसैनिकांचे गावपातळीवर सख्य नाही. त्यातूनही कटुता वाढत गेली. नगर तालुक्यातील गावांत येताना औटी शिवसैनिकांना विचारात घेत नसल्याचाही आरोप औटींवर केला जात आहे. अशा अनेक कारणांनी या भागातील पक्ष संघटना व औटी यांच्यातील दरी रूंदावत गेली आहे. या भागातील बहुतांशी पदाधिकारी गाडे यांच्या श्रीगोंद्यातील प्रचारात आहेत. काही जे आहेत ते अदयाप औटींच्या प्रचारात दिसत नाहीत.
तालुक्याची अस्मिता
औटी व शिवसेनेतील दुहीचा फायदा लामखडे यांना होण्याची शक्यता आहे. सेना पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेच्या तिसऱ्या व चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश मिळत आहे. तालुका अस्मितेच्या नावाखाली नगर तालुक्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लामखडेंबरोबर दिसत आहेत. औटी व शिवसेनेतील दुहीचा फायदा लामखडे यांना होण्याची शक्यता आहे. सेना पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेच्या तिसऱ्या व चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश मिळत आहे. तालुका अस्मितेच्या नावाखाली नगर तालुक्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लामखडेंबरोबर दिसत आहेत.