आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्वबळ‌ा'मुळे होतेय उमेदवारांची दमछाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आघाडी व युती कायम असताना पक्षाच्या उमेदवारांना मोठी ताकद मिळत असे. तथापि, या निवडणुकीत युती व आघाडी तुटल्याने मित्रपक्षांचे उमेदवार विरोधात लढत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची गोची झाली असून वातावरण निर्मितीत अडचणी येत आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आणि शिवसेना, भाजप व इतर घटक पक्षांची महायुती होती. पण विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सर्वच पक्षांना स्वबळाची उबळ आली. जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस अगोदर युती व आघाडीत फारकत होऊन सर्वांनी स्वबळाचा नारा दिला. मागील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या काही उमेदवारांनी बंडखोरी करून इतर पक्षांचा झेंडा हाती घेतल्याने सर्वच उमेदवारांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भांबावलेल्या उमेदवारांकडून विकासकामांपेक्षा वैयक्तिक टीकाटिप्पणीला अधिक महत्व दिले जात आहे.
राहुरीत प्रसाद तनपुरेंचे समर्थक म्हणजेच राष्ट्रवादीची ताकद अशी परिस्थिती होती. तथापि, ऐनवेळी डॉ. उषा तनपुरेंनी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे जुने आणि नवे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी गाडे यांना बसणार आहे. विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यासमोर तनपुरेंचे कडवे आव्हान आहे. पण तनपुरेंना तालुक्यातीलच राष्ट्रवादीचे उमेदवार गाडे यांच्याकडे जाणा-या मतांची धास्ती आहे. त्यामुळे स्वबळावरची निवडणूक या मतदारसंघाला परवडणार नाही.
नेवाशात भाजप व शिवसेना स्वतंत्र रिंगणात असल्याने शंकरराव गडाखांसाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. तथापि, भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्याविषयी नेवासेकरांची सहानुभूती वाढली आहे. शिवसेनेचे साहेबराव घाडगे आणि काँग्रेसचे दिलीप वाकचौरे किती मते घेतात, यावर तालुक्याच्या भावी आमदाराचे भवितव्य अवलंबून आहे.

शेवगावात 11 उमेदवारांसह राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चंद्रशेखर घुले रिंगणात आहेत. काँग्रेसची उमेदवारी अजय रक्ताटे यांना आहे. भाजपच्या मोनिका राजळे यादेखील घुले यांना कडवी झुंज देऊ शकतात. त्याबरोबरच मनसेचे देविदास खेडकर, बसपाचे डॉ. दादासाहेब काकडे यांच्यासह इतर उमेदवार किती मते घेतात याची गणिते जुळवून आमदारकीची स्वप्ने रंगवली जात आहेत. कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यासह ११ उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेंसमोर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र फाळके यांचे आव्हान आहे. काँग्रेसचे किरण ढोंबे व शिवसेनेचे रमेश खाडे यांनीही प्रचाराला गती दिल्याने कोणाचे पारडे जड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पारनेरमध्ये 14 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेत फूट पडली असून बाबासाहेब तांबे यांनी बंडखोरी करून भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आमदार विजय औटी यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. सुजित झावरे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार माधवराव लामखडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने सर्वच उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघात एकमेकांना समर्थन देण्याचे पेव फुटल्याने चुरस वाढली आहे.
अकोल्यात भाजपचे अशोक भांगरे व शिवसेनेचे मधुकर तळपाडे एकमेकांच्या विरोधात उभे टाकल्याने राष्ट्रवादीचे वैभव पिचड यांना सोयीचे झाल्याचे बोलले जाते. मात्र, शेवटच्या टप्प्यात समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. श्रीरामपूरची परिस्थिती फारशी वेगळी नाही. स्वबळाचा फटका काँग्रेससह भाजप व शिवसेनेलाही बसणार आहे. काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या सुनिता गायकवाड, भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेचे लहू कानडे यांचे आव्हान आहे. इतर उमेदवार किती मते घेतात यावरच विजयी उमेदवार ठरेल. श्रीगोंद्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचा त्याग करून बबनराव पाचपुते भाजपकडून, तर काँग्रेसचे राहुल जगताप राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. काँग्रेस, शिवसेनेसह एकूण 15 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत.
कार्यकर्ते कंटाळले
उमेदवार एकच भाषण थोडासा बदल करून विविध गावांत मतदारांना ऐकवत आहेत. ज्या कार्यकर्त्यांना रोजंदारीने या उमेदवारांबरोबर फिरावे लागते, त्यांना या भाषणांचा कंटाळा आला आहे. विकासाच्या मुद्द्यांना बाजूला सारून वैयक्तिक टीकेतच प्रचारसभांचा वेळ खर्ची पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.