आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौरंगी लढतीमुळे यंदा चुरस वाढली, नगर शहर मतदारसंघातील प्रचार पोहोचला शिगेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील प्रमुख चार उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकून विजयाची डबल हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नांत असलेल्या आमदार अनिल राठोड यांच्यासमोर नवख्या उमेदवारांचे आव्हान आहे. चौरंगी लढतीमुळे यावेळी नगर मतदारसंघात चुरस वाढली आहे.
जातीपातीला थारा न देणारा मतदारसंघ म्हणून नगरची ख्याती आहे. मात्र, यावेळी विविध समाजांकडून पाठिंबा मिळत असल्याची निवेदने फोटोसह प्रसिद्धीसाठी पाठवली जात आहेत. शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीकडून महापौर संग्राम जगताप, काँग्रेसकडून सत्यजित तांबे, भाजपकडून अ‍ॅड. अभय आगरकर हे प्रमुख चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाकडून आसाराम कावरे, जनता दलाकडून (युनायटेड) सचिन राठोड यांच्यासह पाच अपक्ष मैदानात उभे आहेत.
यापूर्वीच्या पाच विधानसभा निवडणुका राठोड यांनी जिंकल्या आहेत. युतीच्या सत्ताकाळात राज्यमंत्रिपदही अल्पकाळासाठी त्यांच्याकडे होते. "मोबाइल आमदार' ही ओळख त्यांचे बलस्थान आहे. जनसंपर्क ही राठोड यांची जमेची बाजू असून सर्वसामान्यांचा फोन येताच उपस्थित राहण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांतील यशाचे ते प्रमुख कारण आहे. संपूर्ण संरक्षणाची हमी देण्याचा नारा देत त्यांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या. यावेळीही सुरुवातीला त्यांनी हा नारा दिला असला, तरी प्रचारात यावर अधिक भर दिलेला नाही. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा आतापर्यंत झाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे महापौर जगताप हे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदाच उतरले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जगताप दुस-यांदा महापौर झाले. तत्पूर्वी पाच वर्षांपूर्वी अडीच वर्षांसाठी ते महापौरपदी होते. नगरोत्थान योजनेतून केलेली कामे, भुयारी गटार योजना मंजूर करण्यातील योगदान यावर जगताप यांनी प्रचारात भर दिला आहे. "आता बदल हवाच', अशी साद घालून त्यांनी नगरकरांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीकडे 18 नगरसेवकांसह मनपाची सत्ता आहे. त्यांच्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची प्रचारसभा झाली आहे.
जिल्हा परिषद सदस्य तथा युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले तांबे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना सुरुवातीला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. हा विरोध समर्थनात बदलण्यात तांबे यशस्वी झाले आहेत. शहर विकासाचा आराखडा व प्रतिज्ञापत्राद्वारे विकासकामाची हमी देत त्यांनी नगरकरांना साद घातली आहे. त्याला नगरकर कसा प्रतिसाद देतात हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेतली.
भाजपकडून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले अ‍ॅड. आगरकर यांनी गेल्यावेळी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम केले आहे. भाजपमधील सर्वांनाच सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची शहरात सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सभा झाली. डबल हॅटट्रिकच्या निश्चयाने मैदानात उतरलेल्या राठोड यांच्यासमोर अ‍ॅड. आगरकर यांच्याबरोबरच नवख्या असलेल्या जगताप व तांबे यांचे आव्हान आहे.
यावेळी उमेदवार कमी
गेल्यावेळी शहरातून 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यावेळी संख्या ११ पर्यंत घसरली आहे. काँग्रेसचे सुवालाल गुंदेचा यांच्यावर राठोड यांनी 39 हजार 545 मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी झालेल्या खिचडीत कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुत्रांसाठी प्रतिष्ठा पणाला
काँग्रेस व राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले तांबे, जगताप हे दोघेही आमदारपुत्र आहेत. विशेष म्हणजे दोघांचे वडील विधान परिषदेचे सदस्य आहेत. संग्राम हे अरुण जगताप यांचे, तर सत्यजित हे डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत. पुत्रांच्या निमित्ताने या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.