आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एटीएम' कार्डधारकांना फसवणारे रॅकेट सक्रिय, लष्करातील जवानाच्या पत्नीची फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रीयकृतबँकेत खाते असलेल्या एटीएम कार्डधारकांच्या पैशांवर ऑनलाइन डल्ला मारणारे रॅकेट शहरात पुन्हा सक्रिय झाले आहे. लष्करात नोकरीला असलेल्या एका जवानाच्या पत्नीला फोनवरून एटीएम क्रमांक विचारून सुमारे ५५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. भिंगार कॅम्प पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सायबर गुन्हेगारीच्या या नव्या स्वरूपाला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आजवर नोंदवलेल्या गुन्ह्यांचाच तपास लागत नाही. त्यामुळे नागरिकांनीच खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे.
जसवंत सिंग छबीन सिंग (४४, डीएमआरसी संकुलजवळ, भिंगार) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ३० जूनला ते ड्युटीवर असताना त्यांच्या पश्चात +९१-७५४४८७०४१९ या क्रमांकावरून त्यांची पत्नी इंदुदेवी यांना सोहन नावाच्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण स्टेट बँक ऑफ मुंबईमधून बोलत असून तुमचे एटीएम कार्ड रिन्युव्ह करायचे असल्याचे त्याने सांगितले. नंतर एटीएम क्रमांक पासवर्डची विचारणा केली. इंदुदेवींनी त्याला माहिती दिली. काही वेळातच सोहन याने सिंग यांच्या एका कार्डवरून ११ हजार रुपयांची ऑनलाइन शॉपिंग केली, तर दुसऱ्या कार्डवरून ४४ हजार २५० रुपये काढले.

काही वेळाने सिंग यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार सांगून रितसर फिर्याद नोंदवली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला अाहे. तपास सहायक निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत.

नगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी यापूर्वीही अशा स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. मात्र, अजूनही प्रलंबित गुन्ह्यांमधील आरोपींना पकडणे पोलिसांना शक्य झालेले नाही. त्यामुळे ऑनलाइन बँकिंगद्वारे एटीएमधारकांना फसवणारे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेदारांना गंडा घालण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. फिर्यादी मात्र फार थोड्या नागरिकांनी नोंदवल्या आहेत.

सतर्कतेमुळे टळली दुकानदाराची फसवणूक
घोडेगाव(ता. नेवासे) येथील दुकानदार जहांगीर इनामदार यांना सोमवारी रात्री एका व्यक्तीने +९१-८५७८०४७३२६ या क्रमांकावरुन फोन करुन बडोदा बँकेतून मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एटीएम कार्ड पासवर्ड रिन्यू करायचा असून आधीच्या कार्डचा क्रमांक पासवर्डची विचारणा त्या व्यक्तीने केली. इनामदार यांना संशय आल्यामुळे त्यांनी तोतया मॅनेजरवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे त्या तोतयाने फोन कट केला. इनामदार यांनी त्याच क्रमांकावर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तो क्रमांक "स्विच ऑफ' झाला. सतर्कता राखून माहिती देण्याचे टाळल्यामुळे इनामदार यांची फसवणूक टळली.

माहिती देणेच चुकीचे
कोणतीहीबँक फोनवरून एटीएम कार्ड किंवा पासवर्ड रिन्युव्ह करत नाही, हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे. थेट बँकेतून बोलत असल्याचे सांगितल्यामुळे अनेकदा नागरिकांची तारांबळ उडते खरी माहिती देऊन ते मोकळे होतात. त्यामुळे फोनवरून बँकेच्या खात्याबद्दल विचारणा करणाऱ्या व्यक्तीला आपली माहिती देणे चुकीचेच आहे. नागरिकांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला उलटसुलट प्रश्न विचारून खात्री करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आपली गोपनीय माहिती देऊ नये. हाच ऑनलाइन बँिकंगद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून टळण्याचा उत्तम उपाय आहे.'' पी.डी. सावंत, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, नगर.

एटीएमची सुरक्षा
नगरशहरातील अनेक एटीएम केंद्रांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. त्याचा फायदा घेत मध्यंतरी एटीएम मधून पैसे लांबवण्याचे प्रकार घडले होते. रात्रीच्या वेळी काही एटीएमच्या बाहेर तरुणांचे टोळके बसलेले असतात. त्यामुळे ग्राहकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते.

सक्षम सायबर शाखा हवी
सायबरआर्थिक गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी मेट्रो सिटींमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळासह आर्थिक सायबर गुन्हे शाखा कार्यरत आहेत. त्यामुळे ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळ्या मुंबई, पुण्यात बसून छोट्या शहरांतील एटीएमधारकांना टार्गेट करत आहेत. त्यामुळे नगरसारख्या शहरातही सक्षम आर्थिक सायबर गुन्हे शाखा असणे गरजेचे झाले आहे. अलीकडेच आर्थिक गुन्हे शाखेचे कामकाज सुरू झाले होते. मात्र, तेथील पाेलिस निरीक्षक नवलनाथ तांबे यांची जळगावला बदली झाल्यामुळे ही शाखा पुन्हा दुबळी झाली आहे. या शाखेचे सक्षमीकरण करून प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावण्याचे आव्हान पोलिस दलासमोर आहे.
बातम्या आणखी आहेत...