आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारातील आरोपीवर भावाचा हल्ला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - बहिणीवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी भावाने आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर न्यायालयाच्या आवारात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. नेवासे तालुक्यातील रस्तापूरच्या अंबिका डुक्रे खून प्रकरणातील आरोपी अनिल पवारवर तिच्या भावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पुढे आलेला पुण्याचा पोलिस कर्मचारी यात जखमी झाला. शहर पोलिसांत गुन्हा दाखल करून हल्लेखोरास अटक करण्यात आली.

सागर आसाराम डुक्रे (20, रस्तापूर, ता. नेवासे) असे हल्ला करणार्‍याचे नाव आहे. रस्तापूर येथील बहुचर्चित अंबिका डुक्रे खून प्रकरणातील आरोपी अनिल जगन्नाथ पवार हा सध्या कोपरगाव व अकोले येथील बलात्कार व खूनप्रकरणी पुणे येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. प्रकरणाची सुनावणी श्रीरामपूर न्यायालयात होती. पवार यास तेथे हजर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील बी. एल. तांबे यांनी मंगळवारी पवारचा जबाब घेतला. सुनावणीनंतर पुणे शहर मुख्यालयातील हवालदार अविनाश महादेव भोसले, पोलिस नाईक एस. एस. धराडे, पोलिस शिपाई प्रशांत जामदार हे पवारला घेऊन न्यायालयाच्या आवारातून जात होते. मृत अंबिकाचा लहान भाऊ सागर याने पवारच्या डोळ्यात मिरची पूड फेकली व दुसर्‍या हातातील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हवालदार भोसले यांनी प्रसंगावधान राखून पवार यास ढकलले व सागर यास पकडले. यात सागरच्या हातातील चाकू भोसले यांच्या हाताच्या अंगठय़ाला लागला.

पॅरोलवर सुटल्यानंतर गुन्हा
अकोले व कोपरगाव येथील अत्याचार व खून प्रकरणात पवार सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षेदरम्यान पॅरोलवर सुटलेला असताना 2 सप्टेंबर 2006 रोजी पवार याने रस्तापूरच्या अंबिका डुक्रे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. तो पुन्हा पसार झाला. पोलिसांनी मोठय़ा शिताफीने त्यास जेरबंद केले.