नगर- माहेरून एक लाख रुपये आणावेत, या कारणावरून
विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मनीषा सुदर्शन गिते (वय 20, राहणार सूर्यानगर, तपोवन रोड, नगर) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनीषाने दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीत मनीषाने म्हटले आहे, ती सासरी नांदत असताना तिचा पती सुदर्शन आदिनाथ गिते, सासू पुष्पा आदिनाथ गिते यांनी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. २ नोव्हेंबरला शेजारी राहणारी रेखा संजय आघाव हिने तिच्या अंगावर रॉकेल ओतले. सुदर्शन याने काडी ओढून मनीषाला पेटवून दिले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिची नणंद नम्रता नितीन रोडगे हिने शिवीगाळही केली.
याप्रकरणी जखमी मनीषा गिते हिने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी तिचा नवरा सुदर्शन, सासू पुष्पा, नणंद नम्रता व शेजारी राहणारी महिला रेखा यांना आरोपी केले आहे.
मनीषावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण काळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक काळे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोिलस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.