आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिचित्रण स्पर्धेतून नगर देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न; नरेंद्र फिरोदिया यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- व्यक्ति चित्रणस्पर्धेच्या माध्यमातून नगरचे नाव कलाक्षेत्रात देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढेही असे उपक्रम हाती घेतले जातील, असे शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. 

फिरोदिया फाउंडेशन कलाजगत न्यासतर्फे देशातील एकमेव अशा अखिल भारतीय पोर्ट्रेट स्पर्धेस शनिवारी बडी साजन मंगल कार्यालयात उत्साहात सुरुवात झाली. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, सुहास बहुळकर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या निमित्ताने नगर शहरात राष्ट्रीय पातळीवरील चित्रकार येत आहेत, ही महत्त्वाची बाब असल्याचे फिरोदिया यांनी नमूद केले. प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी स्पर्धकांचे स्वागत केले. विद्यार्थी व्यावसायिक चित्रकारांना स्पर्धेत सहभागाची संधी, चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दलचा पुरस्कार यामुळे या स्पर्धेचा लौकिक देशभर झाल्याचे ते म्हणाले. 

पहिल्या दिवशी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी होती. शनिवारी ज्येष्ठ चित्रकार अक्षयकुमार झा गतवर्षीचे विजेते मनोज सगळे यांनीही व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक सादर केले. ते पाहण्यासाठी चित्र रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

स्पर्धकांना मॉडेलनी सात-आठ तास एका जागेवर निश्चलपणे बसून सहकार्य केले. त्यामुळे स्पर्धकांचे काम सोपे झाले. त्यांच्या कलेच्या सादरीकरण पाहण्यासाठी शालेय, कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, तसेच कलारसिकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी या स्पर्धेत नामवंत व्यावसायिक चित्रकार सहभागी होणार आहेत. 

स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील कलावंत सहभागी झाले आहेत. स्पर्धास्थळी वास्तववादी चित्रकार लेखक रवी परांजपे यांच्या गाजलेल्या १५ चित्रांचे, तसेच गतवर्षीच्या विजेत्या स्पर्धकांनी रेखाटलेल्या चित्रांच्या दालनाने चित्र रसिकांचे स्वागत झाले. 
बातम्या आणखी आहेत...