आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aunty Corruption Bureau Published Photo From Now

लाचखोरांचे फोटो होणार आता ‘लाचलुचपत’च्या वतीने प्रसिद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्यांचे फोटो आता प्रसिद्ध करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला असून, त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. मागील चार दिवसांत नाशिक परिक्षेत्रात लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलेल्या विविध कारवायांचे फोटो प्रसारमाध्यमांना पाठवले जात आहेत. या नव्या निर्णयामुळे लाचखोरीला आळा बसण्यास मदत होऊ शकेल.

शासकीय कार्यालयांत होणा-या लाचखोरीला आळा बसावा, या हेतूने शासनाने स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती केली. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले. लाच घेणे हा गुन्हा आहे, असे फलक सर्व शासकीय कार्यालयांत लावण्यात आले आहेत. असे असूनही शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी खुलेआम पैसे मागितले जात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दररोज होत असलेल्या कारवायांवरुन स्पष्ट होते. यापूर्वी संबंधितांची केवळ नावेच प्रसिद्ध केली जात.
आता संबंधितांचे फोटोही सार्वजनिक केले जाणार आहेत. तसा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला आहे. त्यानुसार मागील चार दिवसांपासून नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होत असलेल्या कारवाईचे फोटो प्रसारमाध्यमांना देण्यात येत आहेत. लाच घेताना पकडलेले अधिकारी, कर्मचा-यांचा फोटो सार्वजनिक होणार असल्यामुळे लाचखोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 ऑगस्टला सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथे ग्रामसेवक रवींद्र शांताराम नेरकर याला 600 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. जळगाव येथे प्राचार्य श्याम पांडे व शिक्षिका अर्चना पांडे यांना लाच घेताना पकडण्यात आले. त्यांचे फोटो प्रसिध्दीसाठी पाठवण्यात आले आहेत. नायब तहसीलदार सुहास खामकर याच्यासह कोल्हापूर, मुंबई, ठाणे, सोलापूर येथील कारवाईचे फोटो बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा
लाच घेताना ज्या व्यक्तीला पकडण्यात आले, त्याचा फोटो प्रसारमाध्यमांना देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधित व्यक्तीचे फोटो प्रसारमाध्यमांना पाठवण्यात येत आहेत. जनतेने केलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.’’ बी. एस. जाधव, उपायुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

‘दिव्य मराठी’ ची दखल
लाचखोरीला आळा बसावा, यासाठी लाच घेणा-यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून संबंधित कार्यालयांच्या दर्शनी भागात लावावी, अशा आशयाचे पत्र काही दिवसांपूर्वी ‘दिव्य मराठी’तील प्रतिवाद या सदरात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने घेतली.

एसबीचा टोल फ्री क्रमांक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1064 हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. या क्रमांकावर महाराष्ट्रातील कुठल्याही नागरिकाला तक्रार देता येईल. नाशिकसाठी 0253-257628, 2578230, मोबाइल 9158242424, नगरसाठी 0241-2423677, मोबाइल 9421967800 हे क्रमांक सुरु करण्यात आले आहेत.