आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर - औरंगाबाद-नगर-पुणे हा रेल्वेमार्ग दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार, यात काही शंका नाही. पुढील वर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची तरतूद करू, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वे नागरी कृती समितीचे निमंत्रक नितीन थोरात व अॅड. अजित काशीनाथ वाडेकर यांना दिले.
थोरात व वाडेकर यांनी शुक्रवारी बन्सल यांची शिर्डीत भेट घेतली. खासदार वाकचौरे यांनी भेट घडवून आणली. या रेल्वेमार्गाच्या आवश्यकतेबाबत वाकचौरे यांनी आधीच बन्सल यांच्याशी सविस्तर चर्चा करून माहिती दिली होती. यावर अनुकूलता दर्शवीत प्रयत्न करण्याचे आश्वासन बन्सल यांनी दिले. खासदार वाकचौरे, थोरात, वाडेकर यांनी औरंगाबाद-पुणे मार्गाबाबत बन्सल यांना निवेदनही दिले. त्यानंतर बन्सल म्हणाले, महाराष्ट्रातील रेल्वेप्रश्नांचा अनुशेष फार मोठा आहे.
त्याला न्याय दिला गेला नाही, याची मला जाणीव आहे. मी रेल्वेमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर देशातील सर्व भागातील रेल्वेचे प्रश्न समजून घेण्यास कमी वेळ मिळाला. त्यामुळे अनेक प्रश्नांचा अर्थसंकल्पात समावेश करण्याचे राहून गेले. देशातील अनेक महत्त्वाचे नवीन रेल्वेमार्ग विकसित करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच बळकटी येणार आहे. त्यामुळे देशातील दुर्लक्षित भाग मुख्य प्रवाहाशी जोडले जाणार आहेत. त्यापैकीच एक औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्ग आहे. तो होण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी खासदार वाकचौरे, थोरात व अॅड. वाडेकर यांना आश्वासन दिले.
दोन कोटी लोकांचा फायदा
थोरात यांनी दिलेल्या निवेदनात या रेल्वेमार्गामुळे तीन जिल्ह्यांतील दोन कोटी लोकांचा कसा फायदा होणार आहे, हे ठळकपणे मांडले आहे.
०औरंगाबाद-नगर-पुणे रस्त्यावर दिवसेंदिवस वेगाने वाढणारी वाहनांची संख्या
०वाढती अपघातांची संख्या, त्यांत जाणारे बळी,
०त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाची सातत्याने वाढती गरज
०मात्र त्यासाठी जागेची अनुपलब्धता ०परिणामी दळणवळणावर होणारा विपरीत परिणाम
०लोकांचा प्रवासासाठी होणारा खर्च व वाढणारा वेळ
यांसारखे मुद्दे या निवेदनात आकडेवारीसह प्रभावीपणे
मांडण्यात आले आहेत.
संभाव्य मार्ग असा
हा मार्ग औरंगाबाद, नगर, सुपे, शिरूर, रांजणगाव, हडपसरमार्गे गेल्यास या परिसरातील सर्व
औद्योगिक क्षेत्रे
जोडली जाऊन
अर्थकारणाला
गती येऊ
शकते.
खासदार वाकचौरेंचा प्रयत्न
‘दिव्य मराठी’ने मांडलेल्या या रेल्वेमार्गाच्या मागणीस पाठिंबा देऊन खासदार वाकचौरे यांनी दिल्ली दरबारी सातत्याने पाठपुरावाही केला. हा मार्ग त्यांच्या शिर्डी मतदारसंघातून जात नसतानाही त्यांनी तीन जिल्ह्यांतील जनतेच्या हिताचा विचार केला. थोरात यांनी यापूर्वीच रेल्वेमंत्र्यांना दिल्लीत निवेदन दिले होते.
दै. ‘दिव्य मराठी’चा आक्रमक पाठपुरावा
या मार्गासाठी आम्ही वाहून घेतले आहे. ‘दिव्य मराठी’ने त्यासाठी सातत्याने केलेला आक्रमक पाठपुरावा व त्याला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे, तसेच खासदार वाकचौरे यांच्या अमूल्य सहकार्यामुळे आम्ही अवघ्या सव्वा वर्षात हा प्रश्न रेल्वे मंत्रालयाच्या पातळीवर नेऊ शकलो, याचे समाधान आहे.’
नितीन थोरात, निमंत्रक, औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वे कृती समिती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.