आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आरटीओं'त तक्रारीपेक्षा ओरड करण्यावरच भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रात्री-अपरात्री रिक्षाचालकांकडून भाडे आकारणीत केल्या जाणाऱ्या मनमानीला लगाम घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुढाकार घेतला आहे. नागरिकांना तक्रार नोंदवण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे, परंतु रिक्षाचालकांवर आरटीओ कार्यालय व वाहतूक शाखा कारवाई करीत नाही, अशी ओरड करणारे नागरिक लेखी तक्रार नोंदवण्यात मात्र माघार घेत आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तक्रारीसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा उपयोग होत नाही.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी कायदा लागू केला आहे. मात्र, अनेकांना या कायद्याची माहितीच नाही. त्यामुळे नगरमधील रिक्षाचालकांचे चांगलेच फावत आहे. कायद्यानुसार प्रवाशाला भाडे स्वीकारण्यास नकार देणे, मीटरऐवजी जादा भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे यासंदर्भातील तक्रारी प्रवासी उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे, शहर वाहतूक शाखेत किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवू शकतात. तक्रार नोंदवण्यासाठी प्रवाशाला रिक्षाचा क्रमांक, तारीख, ठिकाण, वेळ आणि कारण नमूद करणे आवश्यक असते.
रिक्षाचालकाच्या प्रत्येक तक्रारीसाठी सुमारे पाचशे रुपयांपर्यंत दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. प्रवाशाने रिक्षाचालकाची रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात येते. अथवा शक्य असेल त्यानुसार आरटीओ विभाग आलेल्या तक्रारीची शहानिशा करते. तक्रारीची दखल घेऊन पाचशे रुपयांचे शुल्क दंड म्हणून वसूल केले जाते. दंडाची रक्कम भरण्यास नकार दिला, तर त्या वाहनाचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्याचा अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने गेल्या सहा महिन्यांपासून ही सुविधा नगरकरांसाठी उपलब्ध केली आहे. पण, एरव्ही प्रशासनाच्या नावाने खडे फोडण्यात पटाईत असलेले नगरकर तक्रार करण्यासाठी समोर येत नाहीत. सहा महिन्यांत अवघ्या दोन ते तीन तक्रारी आल्या. त्यापैकी दोन तक्रारी रात्री अवाजवी भाडे मागितल्याच्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने आलेल्या तक्रारींची शहानिशा करून आतापर्यंत दोन रिक्षांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे.
येथे पाठवा तक्रार
{ई मेल आयडी - mh16@mahatranscom.in
{उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अहमदनगर. तसेच शहर वाहतूक शाखा, पत्रकार चौक, अहमदनगर या पत्त्यावर
{ई मेल किंवा पोस्टकार्डवर लेखी स्वरूपात तक्रार करताना वाहन क्रमांक, दिनांक, वेळ व ठिकाण, तक्रारीचे स्वरूप, वाहनावरील ठळक खुणा, तक्रारदाराचे नाव, पत्ता, तसेच दूरध्वनी क्रमांक कळवावा.
{जवळच्या पोलिस ठाण्यातही तक्रार करता येईल.
(माहिती : उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयातून)