आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिक्षांचे बाद परवाने पुन्हा देण्याचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ऑटो रिक्षाचालकांचे बाद झालेले परवाने देण्याची मागणी जिल्हा रिक्षा पंचायत समितीमार्फत करण्यात आली आहे. मागणीचा विचार करून पुन्हा परवाने देण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन प्रादेशिक परिवहन विभागाने संघटनेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रिक्षा पंचायतचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले, उस्मान पठाण, विलास कराळे, अशोक औशीकर, लतीफ खलील आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत घुले यांनी संघटनेच्या अडीअडचणी मांडल्या. शहरात राजरोसपणे परिवहन खात्याच्या कार्यालयासमोरून खासगी रिक्षा अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखा दहा ते बारा वर्षांपासून विनापरवाना रिक्षांवर कारवाई करण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. खासगी रिक्षा वाढवण्यासाठी दोन्ही खात्यांचे अधिकारी जबाबदार आहेत. अवैध रिक्षाचालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने परवानाधारक रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. परवानाधारक रिक्षाचालक विविध करांचे शुल्क वेळेत भरतात. परंतु अवैध रिक्षाचालकांकडून कोणताही कर भरला जात नाही.

शहरातील सक्कर चौक, शिवाजी पुतळा ते दिल्लीगेट, माळीवाडा ते शहर वाहतूक शाखा भागात अवैध रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अवैध वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई करावी. तसेच रिक्षांचे जे परवाने यापूर्वी बाद झाले आहेत. त्यांना मागणीनुसार परवाने द्यावेत, दंडाची रक्कम पन्नास टक्के करावी, इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करू नये, असे संघटनेचे म्हणणे आहे. यावर कांबळे यांनी बाद झालेले परवाने देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवला आहे. त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले.