आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Available Water In Nagar District Issue , Divya Marathi

जिल्ह्यात अवघे तीन टीएमसी उपयुक्त पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मे महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील दोन मोठ्या धरणांत अवघा तीन टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारदरा धरणात एक, तर मुळा धरणात दोन टीएमसी उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. मान्सून वेळेवर बरसला, तर पाणीटंचाईचे संकट भेडसावणार नाही. मात्र, मान्सूनचे आगमन लांबल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

गेल्या तीन वर्षांपैकी सुरुवातीची दोन वर्षे दुष्काळामुळे जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. गेल्यावर्षी ब-यापैकी पाऊस झाला. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर मुळा धरणातही समाधानकारक पाणी साठले. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे यावर्षी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला जिल्ह्यातील धरणांमधून पाणी द्यावे लागले नाही. त्यामुळे दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात सव्वा महिन्यापूर्र्वी सुरू करण्यात आलेले उन्हाळी आवर्तन विनासायास पार पडले. आवर्तन सोडण्यापूर्वी दोन्ही धरणांमध्ये दहा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
आवर्तनानंतर आता दोन्ही धरणांत अवघा तीन टीएमसी पाणीसाठा उरला आहे. यावर्षी मान्सून कमी बरसणार असल्याचा अंदाज बहुतेक हवामानविषयक अंदाज वर्तवणा-या संस्थांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध उपयुक्त पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी मांडली आहे. मात्र, या संस्थांच्या अंदाजांकडे
साफ दुर्लक्ष करून पाण्याची उधळपट्टी होऊ देण्यात आली. मान्सूनच्या आगमनावरच पाण्याचे नियोजन अवलंबून राहणार आहे.

गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट उपयुक्त पाणीसाठा
गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस दोन्ही धरणांमध्ये अवघा दीड टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. शासनाच्या निर्णयानुसार दोनदा, तर मुंबई उच्च् न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार एक वेळा जायकवाडी धरणासाठी या दोन धरणांतून पाणी सोडण्यात आले होते. जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा धोका लक्षात घेऊनच उन्हाळी आवर्तनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. आचारसंहिता कालावधीत अधिका-यांच्या पातळीवर हा निर्णय घेण्यात आला.