आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avhad Collage Lybrari 98 Thousanf E Books Available Issue

वाचन संस्कृती : ‘हायब्रीड लायब्ररी’त 98 हजारांवर ई-बुक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने ग्रंथालय क्षेत्रात क्रांती करून 98 हजार ई-बुक्स व साडेतीन हजार ई-नियतकालिकांच्या सेवेसह ‘हायब्रीड लायब्ररी’ ही संकल्पना विद्यार्थी व वाचकांसाठी अंमलात आणली आहे. 45 हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असलेले हे ग्रंथालय संगणकीकृत व सीसीटीव्ही कॅमे-याच्या नजरेत आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात असा उपक्रम राबवणारे आव्हाड महाविद्यालय एकमेव ठरले आहे.

संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, उपक्रमशील ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड, ग्रंथालय लिपिक अभिजित आव्हाड या टीमच्या उत्कृष्ट समन्वयाने ‘हायब्रीड ग्रंथालय’ ही कल्पना आकाराला आली. महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षात ग्रंथांची संख्या 51 हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी मोफत इंटरनेट सुविधा, सर्व पुस्तकांना बारकोड असून पुस्तकांची देवाण-घेवाण संगणकीकृत असलेले पुणे विद्यापीठांतर्गत एकमेव महाविद्यालय आहे. आधुनिक तंत्रज्ञान, विविध माहितीच्या 217 सीडी, डीव्हीडी आहेत.
मागील पाच वर्षांत या केंद्राचा लाभ घेऊन 712 विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये भरती झाले. राज्यातील एकमेव स्पर्धा परीक्षा केंद्र अशी शैक्षणिक वर्तुळात या ग्रंथालयाची प्रतिमा झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, तज्ज्ञांची व्याख्याने यासह टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस प्रशिक्षण शिबिर झाले. 72 विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला. दरवर्षी 12 ऑगस्टला ग्रंथप्रदर्शन भरवले जाते.

गेल्या पाच वर्षांत केंद्रीय व राज्य सेवा उत्तीर्ण झालेले, शासकीय सेवेतील वर्ग एकच्या अनेक अधिका-यांनी ग्रंथालयास भेट देऊन गौरवले आहे. शांत व रम्य वातावरणामुळे ग्रंथालयाकडे जातानाच सरस्वती देवीच्या प्रसादाकडे जात असल्याचे समाधान मिळते, अशा शब्दांत राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव आव्हाड यांनी या ग्रंथालयाचे वर्णन केले होते. वाचन संस्कृती तालुक्यात रुजण्यास आव्हाड महाविद्यालयाच्या या ग्रंथालयाचा मोठा वाटा आहे. येथून गेलेला प्रत्येक माजी विद्यार्थी कोणत्याही पदावर असला, तरी गावाकडे आल्यावर ग्रंथालयास धावती भेट देतोच. शहरातील शैक्षणिक पर्यटन केंद्रात याचा समावेश होऊन सर्वांसाठी प्रेरणा ठरावी यासाठी तालुक्यात येणा-यांना ग्रंथालय बघण्याची सुविधा देण्यावर महाविद्यालय लवकरच निर्णय घेणार आहे.

1450 पुस्तके, संदर्भ ग्रंथ उपलब्ध
ग्रंथालयात 78 मासिके व संशोधनात्मक नियतकालिके घेतली जातात. वर्षाच्या शेवटी यांची बांधणी केली जाते. त्याचा संशोधन व संदर्भासाठी उपयोग होतो. अशी 252 बांधणी झालेली नियतकालिके आहेत. संदर्भ ग्रंथसेवा, वृत्तपत्र कात्रणे, पुस्तक पेढी योजना आदी उपक्रम लाभदायक सिद्ध झाले आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी 1450 पुस्तके व संदर्भ ग्रंथ व नियतकालिके उपलब्ध आहेत.

तालुक्यातील विद्यार्थ्यांना दुर्मिळ संधी
- या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी नसलो, तरी ग्रंथालयाचा आहे. अभय आव्हाड व प्राचार्य डॉ. ढाकणे यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली. बाहेर शिकायला गेल्याशिवाय येथील महत्त्व पटत नाही. ग्रंथालयावरून कॉलेजची ओळख व्हावी. इतका आवाका या ग्रंथालयाचा झाला आहे.’’ महेश काटमोरे, विद्यार्थी.

ग्रंथालयाचे ग्रंथपाल उपक्रमशील
- ग्रंथालयासाठी वाहून घेतलेला उपक्रमशील ग्रंथपाल या ग्रंथालयाला भाग्याने लाभला आहे. शेकडो विद्यार्थ्यांना सर्वसेवांचा मोफत लाभ मिळत आहे. या ग्रंथालयामुळे गेल्या पाच वर्षांत महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे किमान पाच कोटी रुपयांची बचत नक्कीच झाली असेल.’’ विशाल पालवे, विद्यार्थी.

फोटो - पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची ‘हायब्रीड लायब्ररी’. छाया : अजय गांधी