आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avoiding The Cost A Deaf Dumb Compassion Given A Birthday Over

वाढदिवसाचा खर्च टाळून जपली मूकबधिरांप्रती सहानुभूती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. या उदात्त जाणिवेतून लग्नाच्या सत्तराव्या वाढदिवसाचा डामडौल टाळून एका दाम्पत्याने मूकबधिर मुलांना मदत करण्याचे ठरवले. मंगळवारी (4 फेब्रुवारी) सायंकाळी या कल्पनेला मूर्त स्वरूप आले अन् या दाम्पत्याच्या चेहर्‍यावर विलक्षण आनंद झळकला. भारतीय युनिट ट्रस्टचे मुख्य जिल्हा प्रतिनिधी विठ्ठलराव शंकरराव सुद्रिक (93) व सिंधूताई (85) हे ते दाम्पत्य.
विठ्ठलराव व सिंधूताई यांचा विवाह 4 फेब्रुवारी 1945 रोजी नगरमध्येच झाला. यंदा त्यांचा लग्नाचा सत्तरावा वाढदिवस वृंदावन लॉनमध्ये आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उभयतांच्या हस्ते 5 मूकबधिर विद्यार्थ्यांना कपडे देण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही सत्तर वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नात नव्हते. म्हणून उपस्थितांनी पुन्हा एकदा मंगलाष्टके म्हणून सुद्रिक दाम्पत्याचा प्रतीकात्मक विवाहसोहळा साजरा केला. या दाम्पत्याच्या आठवणींना उजाळा देणार्‍या छायाचित्रांचा लघुपट यावेळी दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या सचिव डॉ. सोनल लेले यांनी केले. निवृत्त विकास अधिकारी महेशचंद्र सुद्रिक, नेत्रतज्ज्ञ उमेशचंद्र सुद्रिक व अँड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सोहळ्यात दोन अनाथ दाम्पत्यांचा विवाह लावण्याचा सुद्रिक कुटुंबीयांचा मानस होता. मात्र, ऐनवेळी तशी जोडपी मिळू शकली नाही. परंतु भविष्यात तसे लग्न जुळवण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. अशा दोन जोडप्यांना कन्यादानाची पाच भांडी, सोन्याचे मणी व दोन वाट्या असलेले मंगळसूत्र सुद्रिक कुटुंबातर्फे प्रदान केले जाईल, असे जाहीर करण्यात आले.
समाजाप्रती कृतज्ञ राहा..
एखाद्या समारंभाला गेल्यानंतर यजमानांना पुष्पगुच्छ देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. पण या पुष्पगुच्छाचा नंतर काही उपयोग होत नाही. त्यामुळे पुष्पगुच्छावर अनावश्यक खर्च करणे टाळावे, त्याऐवजी यजमानांनी समारंभात एखादा खोके ठेवावे. जेणेकरून येणारे आप्तेष्ट, पाहुणे ठरावीक रकमेचे पाकीट त्यामध्ये टाकतील. ही रक्कम एखाद्या समाजसेवी संस्थेला देता येईल, असे आवाहन अँड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी केले.