आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचे आयुर्वेद महाविद्यालय बंद पडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरचे गंगाधर शास्त्री गुणे महाविद्यालय गैरव्यवहार व अनागोंदीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सलग तिसऱ्या वर्षी महाविद्यालयात नवीन प्रवेश होणार नाहीत. कारण सरकारने यावर्षी प्रवेशासाठी जाहीर केलेल्या १०६ महाविद्यालयांच्या यादीत गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे नावच नाही.
राज्यातील पहिले खासगी आयुर्वेद महाविद्यालय असा लौकिक असलेले हे महाविद्यालय गेल्या तीन वर्षांपासून अनागोंदी व गैरव्यवहारांमुळे सतत चर्चेत आहे. सध्या महाविद्यालयात ४५ विद्यार्थी आहेत. पुढच्या वर्षी त्यांचा अभ्यासक्रम संपल्यावर त्यांची जागा घेण्यास दुसरे विद्यार्थीच नाहीत. त्यामुळे हे महाविद्यालय बंद पडण्याच्या स्थितीत आहे.
आयुर्वेद महाविद्यालयात अनागोंदी व गुंडगिरीचे साम्राज्य आहे. हे महाविद्यालय कसेही करून बंद पाडण्याचा व संस्थेची शहरातील मोक्याच्या जागेवर असलेली १३ एकर जागा बळकावण्याचा संस्थेच्या अध्यक्षांचा डाव असल्याचा गंभीर आरोप महाविद्यालयात ३० वर्षे प्राध्यापक असलेले डॉ. श्रीधर दरेकर यांनी फेब्रुवारीत केला होता. त्यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, आमदार अनिल राठोड यांनी विधानसभेत याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यावर सरकारच्या आदेशाने आतापर्यंत आयुर्वेद सहसंचालक सुधीर लोणे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. सूर्यवंशी व कार्यालयीन अधीक्षक वा. भा. गिरी यांच्या समित्यांनी येथे येऊन चौकशी केल्याची माहिती समजली. त्यावेळी त्यांनी डॉ. दरेकर यांनाही बोलावून चौकशी केली. त्यांनी ४९ पानांचे निवेदन व पुरावे सादर केले. आता पुन्हा एक समिती स्थापन करून सर्व गैरप्रकारांची चौकशी करावी, असा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती डॉ. दरेकर यांनी दिली. प्रवेशासाठी महाविद्यालयांची अजून एक यादी प्रसिद्ध होणे बाकी आहे. यंदा महाविद्यालयाला प्रवेशासाठी परवानगी मिळाली, तर आनंदच होईल. कारण ही संस्था वाचणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
यंदाच्या पाच याद्यांत ‘गुणे’चे नाव नाही
आतापर्यंत ज्या महाविद्यालयांना प्रवेशास परवानगी देण्यात आली, त्यांच्या पाच याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यात गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयाचे नाव नाही. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘आयुष’ विभागाची शेवटची यादी २२ ऑगस्टला प्रसिद्ध झाली. त्यातही गुणे महाविद्यालयाचे नाव नाही. या यादीत देशातील १६७ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. त्यात जिल्ह्यातील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय (शेवगाव), संगम सेवाभावी ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय, अश्विन सरल आयुर्वेद कॉलेज, सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय (सर्व संगमनेर) व आयुर्वेद महाविद्यालय (राहुरी) अशी पाच महाविद्यालये आहेत.
कॉलेजचे विधी सल्लागार अ‍ॅड. प्रसन्ना जोशी यांनी दिलेली उत्तरे
एकूण तीन वर्षे नवीन प्रवेश का नाहीत?

हे चुकीचे आहे. वैद्यकीय शिक्षणाबाबत निकष ठरवणाऱ्या केंद्राच्या सीसीआयएम व राज्यातील नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे दोन वर्षांपूर्वीचे प्रवेश अडचणीत आले. त्याला संस्था जबाबदार नाही. निकष ठरवणाऱ्या यंत्रणांचा तो दोष आहे. राज्यातील १६ महाविद्यालयांमध्ये ही समस्या निर्माण झाली होती. एक वर्षाचा अपवाद वगळता प्रवेशात खंड पडलेला नाही.
विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?
परीक्षा प्रवेश नाकारलेल्या गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी वगळता इतर सर्व शुल्क परत करण्यात आले आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांच्या नुकसानीला निकष ठरवणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणा जबाबदार आहेत.
महाविद्यालयाची चौकशी का सुरू आहे?
विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या अतारांकीत प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी मागवलेली कागदपत्रे संस्थेने दिली आहेत. याला चौकशी म्हणता येणार नाही.
रुग्णांची बोगस संख्या दाखवल्याचे आरोप खोटे असतील, तर दररोज किती ओपीडी होतात?
अशाचे प्रकारचे आरोप करून डॉ. दरेकर यांनी कोर्टात क्रिमिनल केस फाईल केली होती. कोर्टाने संस्थेला साधे समन्सही न काढता प्रकरण फेटाळले. यावरून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट होते.
विद्यार्थ्यांना हवी नुकसान भरपाई
सन २०१० मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षाच देता न आल्याने त्यांची दोन वर्षे वाया गेली. कारण सी. सी. आय. एम. ने (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन) दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याचे कोणतेही प्रयत्न व्यवस्थापनाने केले नाहीत. त्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांना यश आले नाही. त्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, शिवाय त्यांना जो मनस्ताप भोगावा लागला, याबद्दल त्यांनी प्रत्येकी २५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थी-विद्यार्थिनींची कुचंबणा
राज्यात ९७ वर्षांपासून जुने असलेले व सन १९१७ मध्ये गंगाधर शास्त्री गुणे यांनी पत्नीच्या अंगावरील दागिने विकून स्थापन केलेले हे महाविद्यालय बंद पडण्याची भीती प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. व्यवस्थापन व प्रभारी असलेल्या प्राचार्यांच्या मनमानीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आवारात राजकीय कार्यकर्त्यांच्या वावरामुळे अनेक विद्यार्थी वसतिगृह सोडून गेले आहेत. यात विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत आहे.''
डॉ. श्रीधर दरेकर, प्राध्यापक. आयुर्वेद महाविद्यालय.
वेडे ठरवण्याचा प्रयत्न फसला
महािवद्यालयात वरिष्ठ असलेले प्रा. डॉ. श्रीधर दरेकर यांनी महाविद्यालयातील गैरकारभाराविरूद्ध फेब्रुवारीत पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवला. त्यांनी त्यासाठी सर्व संबंधित खात्यांकडे तक्रारींची निवेदने पाठवली. डॉ. दरेकर सातत्याने तक्रारी करत असल्याने व्यवस्थापनाकडून त्यांना वेडे ठरवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांकडून शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सशक्त असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने संस्था व्यवस्थापनाचा हा प्रयत्न फसला.
कर्मचारी ग्रॅज्युइटीपासून वंचित
महाविद्यालयातील गैरकारभाराचे अनेक नमुने चर्चेत आहेत. त्यात कर्मचाऱ्यांच्या कुटुंब कल्याणाचा विषयही आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यातील एक म्हणजे गेल्या २५ वर्षांत निवृत्त झालेल्या एकाही कर्मचाऱ्याला ग्रॅज्युइटीची रक्कम मिळाली नसल्याची माहिती डॉ. श्रीधर दरेकर यांनी दिली. सर्व निवृत्तांना ती व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी
"दिव्य मराठी'शी बोलताना दिला.
रुग्णांचा तुटवडा; बोगस नोंदणी
दिवसभरात जेमतेम २० ते २५ रुग्ण येतात. त्यांना त्रिफळासारखी औषधेही मिळत नाहीत. तरीही रुग्णांची संख्या १२५ ते १५० पर्यंत दाखवली जाते. येथील ऑपरेशन थिएटर कायम बंद असते. अगदी दाखवण्यासाठी वर्षभरात जेमतेम १०-१२ शस्त्रक्रिया होतात. मात्र, वर्षभरात हजारो शस्त्रक्रिया होत असल्याची खोटी आकडेवारी सादर केली जाते. ही सर्व परिस्थिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समित्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी महाविद्यालयाला नवीन प्रवेशासाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थीच नसतील, तर महाविद्यालयाला काहीच अर्थ उरणार नाही, असे डॉ. दरेकर यांचे म्हणणे आहे.