आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळावर प्रशासक नेमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचलित गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार बोकाळला आहे. खंडणी, फसवणूक यामुळे विद्यार्थी, अध्यापक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. महाविद्यालयाच्या आवारात राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी संस्था बचाव कृती समितीचे डॉ. र्शीधर दरेकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. शुक्रवारी आणखी काही सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
संस्थेने कर्मचार्‍यांचे 2005 पासून व अध्यापकांचे 2008 पासून भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. संबंधित कार्यालयाने पाठपुरावा करूनही संस्था व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. पगारखाते गोठवण्याचा पवित्रा घेतल्यानंतर संस्थाचालक व प्राचार्य संगीता निंबाळकर यांनी अध्यापक व कर्मचार्‍यांकडून 14 हजार वसूल करून पीएफ खात्यात भरली. कर्मचारी पतपेढीकडून काहींची कर्जप्रकरणे करून ही रक्कम भरण्यात आली. सुमारे 9 ते 10 लाखांची खंडणी उकळण्यात आल्याचा आरोप डॉ. दरेकर यांनी केला आहे.
सन 2010 मध्ये विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून प्रवेश देण्यात आले. त्यामुळे 50 विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले. या विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्याची मागणी डॉ. दरेकर यांनी केली. संस्थेत सन 2012 मध्ये प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. संस्थेने त्रुटी दूर केल्या नाहीत, म्हणून प्रवेश नाकारण्यात आले. यात संस्थेचे 5 ते 6 कोटींचे नुकसान झाले, असे ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांचे चिरंजीव महापौर संग्राम जगताप यांनी वसतिगृहात राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू केले. 97 वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेत राजकीय पक्षाचे कार्यालय ही निंदनीय बाब आहे. या सर्व गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत डॉ. दरेकर यांनी उपोषण सुरू केले आहे.