आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटीविनाच दिल्लीहून परतले विद्यार्थी..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर- गुणे आयुर्वेद महाविद्यालयाप्रमाणेच संगमनेर येथील दोन व राहुरीतील एका महाविद्यालयात गेल्यावर्षी बीएएमएस व एमडीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारले आहे. प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे गार्‍हाणे महाराष्ट्रातील नेत्यांनी ऐकले नसल्याने निराश होऊन ते परतले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील अशा विद्यार्थ्यांचे संघटन करून आंदोलन उभारण्याची तयारी करण्यात येत आहे.

गुणे महाविद्यालयात गेल्यावर्षी बीएएमएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊन वर्षभर शिकलेल्या विद्यार्थ्यांना अचानक परीक्षेपूर्वी प्रवेशच झाले नसल्याचे सांगण्यात आले. डीएमईआरमार्फत प्रवेश झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. विद्यापीठाने परीक्षेस बसू न दिल्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत विद्यार्थ्यांनी दाद मागितली, पण त्यात यश आले नाही.

प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांनी 35 ते 50 हजार रुपये शुल्कापोटी भरले आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठ व महाविद्यालय व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे पैसे व उमेदीची दोन वर्षे अक्षरक्ष: वाया गेली आहेत.

राहुरी व संगमनेर येथील खासगी महाविद्यालयात लाखो रुपये डोनेशन देऊन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची परिस्थितीही गुणे आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांंप्रमाणेच झाली आहे. बीएएमएसच्या दुसर्‍या वर्षी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांचा संताप थोपवण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करत आहे. एमडीसाठी बारा लाख डोनेशन देणार्‍या विद्यार्थ्यांंचे प्रवेशच अवैध ठरवल्याने व्यवस्थापनापुढेही पेच निर्माण झाला असून विद्यार्थी व पालकांच्या संतापाला आवर घालताना त्यांच्याही नाकीनऊ आले आहेत.

केंद्रातील मराठी मंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याची विनंती करण्यासाठी नगर, अमरावती व यवतमाळचे विद्यार्थी दिल्लीला गेले होते. मात्र, संबंधित मंत्र्यांनी भेट नाकारली. त्यामुळे निराश होऊन विद्यार्थी शनिवारी परतत आहेत. भवितव्यच हरवलेल्या या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन व विद्यापीठाला धडा शिकवून न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारी चालवली आहे.