नगर - भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांनी नगर अर्बन बँकेत अतिशय बालिशपणे गैरव्यवहार केले. अशा व्यक्तीने सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला हवे होते. गांधी यांना उमेदवारी देऊन नरेंद्र मोदी यांनी त्यांची पाठराखण केली, असा हल्लाबोल तिसर्या आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
कोळसे म्हणाले, गांधी यांनी पाहुण्यांच्या जेवणाचे खोटे बिल सादर करून चुलतभावाला 95 हजार रुपये बँकेतून दिले. नाश्ता, चहा-पाण्याचे केवळ तीनशे रुपयांचे बिल सादर करून बँकेला लुबाडणार्यांना खासदारकीच्या पात्रतेचे समजता येणार नाही.
सहकार खात्याची स्थगिती असतानाही नोकरभरती व नवीन शाखा उघडून गांधी यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप कोळसे यांनी केला. गैरव्यवहार चव्हाट्यावर येऊ नयेत, यासाठी गांधी यांनी लेखापरीक्षकास बँकेकडून 11 लाखांचे बक्षीस दिले. सख्खा भाऊ व र्मजीतील लोकांना व्याजात सूट देऊन बँकेचे 3 कोटी 79 लाखांचे नुकसान केले. सहकार खात्याने या प्रकरणाची चौकशी करून गांधींसह संचालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे. गांधींची मालमत्ता विकून वसुली करण्याचे आदेश सहकार निबंधकांनी दिले आहेत. या आदेशाला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना शाखेच्या उद्घाटनाला बोलावून त्यांच्यावर खर्च केल्याचे दाखवत बँकेकडून पैसे लाटले. असा कोणताही खर्च बँकेकडून करण्यात आला नसल्याचे मंत्र्यांकडून माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे. कर्जवाटपातही अशीच अनागोंदी गांधी यांनी केल्याचा आरोप कोळसे यांनी केला.
अनेकांचा छुपा पाठिंबा
उघडपणे आपला प्रचार करण्यास कोणी तयार नसल्याचे सांगताना कोळसे म्हणाले, अशा लोकांचा मला छुपा पाठिंबा आहे. आमदार राठोड, औटी, तसेच बाळासाहेब विखे यांचा पाठिंबा नाही. मात्र, त्यांनी माझ्यासाठी काम केले, तर चांगलीच बाब आहे. राष्ट्रवादीचे राजळे यांच्याबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन समाचार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.