आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे, बबनराव ढाकणे यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- धरणांची निर्मिती दुष्काळी भागाच्या विकासासाठी झाली. भंडारदरा मुळा ही धरणे काय एकट्या नगर जिल्ह्याच्या मालकीची आहेत का? उत्तरेकडील पाच तालुके म्हणजे नगर जिल्हा आहे का? असा सवाल करत माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी या धरणांतून मराठवाड्याला पाणी दिले पाहिजे, असे सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपने विकासकामांत हिस्सेदारी मागितली, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ढाकणे बोलत होते. धरणांची निर्मिती दुष्काळी भागाचा विकास व्हावा यासाठी झाली होती. मुळा, भंडारदरा धरणे ही काय एकट्या नगर जिल्ह्याच्या मालकीची आहेत का? ती शासनाची आहेत. दक्षिणेकडील लोक पाण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून लढा देत आहेत. पाणी नाही, कामे नाहीत. विकासाच्या दृष्टीने दक्षिण जिल्हा उद््ध्वस्त झाला आहे. ही धरणे दुष्काळी भागासाठी असताना त्यांचा उपयोग गेल्या ५० वर्षांपासून उत्तरेकडील लोकांनी शेतीसाठी केला. माझे ते माझे तुझे ते माझे अशी मनोवृत्ती वाढली आहे. वाट्टेल ते झाले तरी चालेल, पण मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे. मराठवाड्यातील माणसे मजुरीसाठी, भांडी घासण्यासाठी तुम्हाला चालतात, मग पाण्यासाठी का चालत नाहीत. मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्याला पाणी देऊ नये, या मागणीसाठी उत्तरेकडे सुरू असलेले आंदोलन हे स्टंटबाजी नव्हे, तर स्वार्थबाजीचे आहे, असेही ढाकणे म्हणाले.

ढाकणे पुढे म्हणाले, माझी भूमिका नेहमीच सर्वसामान्यांच्या बाजूने प्रस्थापितांच्या विरोधात राहिलेली आहे. गेल्या दीड वर्षापासूनची स्थिती पाहता सध्याचे सरकार शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, मजूर वर्गाला उद््ध्वस्त करते की काय, अशी भीती मला वाटते. सत्तेवर कोण आणि विरोधक कोण हे समजत नाही. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांचा दबाव राहिलेला नाही. अशा प्रकारचा दबाव केवळ माजी केंद्रीय कृषी शरद पवार हेच ठेवत होते. पवार हे ग्रामीण भागातील माणसांचा विचार करून निर्णय घेतात. काही झाले की त्याचे पाप शरद पवार यांच्यावर टाकले जाते, पुण्याचे काम स्वत:कडे घेतले जाते. ही प्रवृत्ती सध्या वाढली आहे. काँग्रेसने केलेली पापे राष्ट्रवादीवर ढकलली जातात. राष्ट्रवादीने केलेली पापे काँग्रेसवर, भाजपने केलेली पापे शिवसेनेवर शिवसेनेने केलेली पापे भाजपवर ढकलण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. काँग्रेसला गर्व झाला होता. त्यामुळे जनतेने त्यांना सत्तेपासून दूर केले.

गेली २० वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर होते. भाजपने त्यांच्याकडून विकासकामे करून घेतली नाहीत. त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून वाटप करून घेतले. त्यांच्याकडूनच हिस्सेदारी मागितली. सहकारी साखर कारखाने खरेदी केले. राज्यातील १७ साखर कारखाने भाजपवाल्यांनी खरेदी केले आहेत. बिल्डर्स काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपचे आहेत. धरणांची कामे त्यांनी वाटून घेतली आहेत, असे ढाकणे म्हणाले.

तो तर विखेंचा शुध्द लबाडपणा
माजीमंत्री बाळ‌ासाहेब विखे यांनी सध्याच्या पाणीटंचाईला दुष्काळाला शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याबद्दल ढाकणे यांना विचारले असता ते म्हणाले, तो तर शुध्द लबाडपणा आहे. विखे यांचे नाव घेता ते म्हणाले, ते आठ वेळा खासदार झाले, सत्तेवर होते. पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंतचे सर्व पंतप्रधान विखे यांनी प्रवरेला आणले. पण प्रवरा परिसर सोडून ते कुठे गेले नाहीत. विखे यांनी पवारांचा फायदा घेतला नाही का? मुळा-प्रवरा वीज संस्थेचे कर्ज कुणाकडून माफ करून घेतले. बा‌ळासाहेब नेमके कुठल्या विचारांचे आहेत हेच कळत नाही.

साखर महासंघ हा प्रस्थापितांचा उड्डा
गेल्याअनेक वर्षांपासून ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी आहे. त्यासाठी ऊसतोडणी मजुरांच्या विविध संघटनांच्या वतीने सुरू असलेला संप योग्यच आहे. गेल्या वर्षी सरकारने आश्वासन देऊनदेखील दरवाढ दिली नाही. कामगारमंत्री शासनस्तरावर मजुरांच्या प्रश्नांवर तोडगा निघणे आवश्यक आहे. साखर महासंघ हा प्रस्थापितांचा अड्डा आहे. त्यामुळे तेथे हा प्रश्न मार्गी लागणार नाही. संप दडपला गेल्यास मीसुध्दा वेगळा निर्णय घेईन.'' बबनरावढाकणे, माजी केंद्रीयमंत्री.