आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - नगरमध्ये चढाओढीतून एक मंत्री अन् चार आमदारांचा बोलबाला आहे. त्यातून बहिष्कारासारखे प्रकार घडतात. मानापमानापेक्षा सेवा महत्त्वाची असून मंत्र्यांसमोर येऊन आपले प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करण्यास प्राधान्य द्यायला हवे, असा टोला पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी सत्ताधारी विरोधकांना मारला.
नगर तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, महापौर शीला शिंदे, समाज कल्याणचे सभापती शाहूराव घुटे, जि. प. सदस्य प्रतिभा पाचपुते, प्राजक्त तनपुरे, अर्थ व बांधकामचे सभापती कैलास वाकचौरे आदी यावेळी उपस्थित होते.
नगर पंचायत समितीवर भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादीने सत्ताधार्यांना विश्वासात न घेता उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केल्याने मानापमान नाट्य रंगले होते. सत्ताधार्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्याचा पाचपुते यांनी चांगलाच समाचार घेतला.
पाचपुते म्हणाले, श्रेय घेण्यासाठी सर्व पुढे येतात. मात्र, दगड भरण्यास आम्ही असतो. चुना-तंबाखू दुसर्यांकडून घेत पालकमंत्र्यांवर पिचकारी मारायचे आता सोडले पाहिजे. नगरच्या एमआयडीसीचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी येणार्या मंत्र्यांसमोर आपले प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली पाहिजे. जे येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. पंचायत समितीच्या उर्वरित रखडलेल्या कामासाठी प्रसंगी नियोजनातून आम्ही निधी देऊ. मागील वर्षी ‘नरेगा’ अंतर्गत जिल्ह्यात 64 कोटींची कामे झाली. यंदा 120 कोटींची कामे करण्यात येणार आहेत. पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांनाही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पाटील यांनी पंचायत समितीच्या इमारतीतील फर्निचरसाठी 72 लाखांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्याचे आश्वासन दिले. ज्यांच्यासाठी घर बांधले, तेच या वास्तूच्या उद्घाटनाला गैरहजर असल्याची बाब खेदजनक आहे.
वास्तूच्या उद्घाटनाला गैरहजर राहून त्यांनी मतदारांचा अपमान केला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील कार्यक्रमाला जाण्यापूर्वी स्टेजवर कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती तर नाही ना, याची खात्री करतात. या स्टेजवरही अशी कोणी व्यक्ती नाही, हे पाहून मलाही बरं वाटलं, असा टोला त्यांनी सत्ताधार्यांना मारला. या इमारतीतून विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
फर्निचर, विजेचे काम अपूर्ण
पंचायत समितीच्या इमारतीसाठी 1 कोटी 45 लाखाच्या कामास मार्च 2010 मध्ये मंजुरी मिळाली. मार्च 2012 पर्यंत हे काम पूर्ण झाले. या सुसज्ज इमारतीसाठी नवीन फर्निचर, वीज व्यवस्था यासाठी आणखी 72 लाखाच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.