आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री आले तरी आमचीच सत्ता - बबनराव पाचपुते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - तालुक्यात सुरू असणारे विकासपर्व जिल्ह्यातील काहींना देखवत नाही. त्यामुळे माझ्याविरोधात त्यांनी राजकीय सुपारी घेतली आहे. या विकासाला खीळ घालण्यासाठी आता काँग्रेसचे तीन मंत्री तालुक्यात येत असले तरी माझे काही बिघडणार नाही. मंत्रीच काय पण मुख्यमंत्री जरी माझ्या विरोधात प्रचाराला आले तरी, श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचीच सत्ता येणार, अशी गर्जना पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. काष्टी येथे पाचपुते यांच्या मातुश्री: तुळसाई यांचे पुण्यस्मरण व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस होते.
पाचपुते म्हणाले, तालुक्यात विकासाचे मोठे काम केले असून काही ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. तीस वर्षे माझ्या माध्यमातून सत्तेचा सर्वाधिक लाभ तुकाराम दरेकर यांनी घेतला. अण्णा शेलारांना खुल्या जागेवर उमेदवारी देऊन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले. ज्यांनी नावाचा गैरवापर केला, त्यांच्यासाठी राजकारणात खूप केले. तेच आता उलटलेत, पण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. येथील सत्ता हिसकावण्यासाठी मंत्री आणले जातात, पण मुख्यमंत्री आले तरी उपयोग होणार नाही. कारण कोपरगाव व राहुरीत मध्यंतरी मुख्यमंत्री प्रचाराला आले. तेथे काँग्रेसला एक-एक जागा मिळाली. त्यामुळे मला कुणाचीच भीती वाटत नसल्याचा विश्वास व्यक्त करून पाचपुतेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करा, कुणीही कुणावर आपापसात विंचू चढवण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला कार्यकर्त्यांना मारला. भोस यांच्यासह सदाशिव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, विक्रमसिंह पाचपुते, उद्धव दुसुंगे यांची यावेळी भाषणे झाली.
कष्टातून संपत्ती कमावली - पाचपुतेंच्या संपत्तीची सीबीआय चौकशीची विरोधकांनी केलेल्या मागणीचा विक्रमसिंह पाचपुते यांनी भाषणात खरपूस समाचार घेतला. पेट्रोल विकणारे धीरूभाई अंबानी कोट्यधीश व उद्योगपती झाले. मग आम्हीही कष्टातून संपत्ती कमावली यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला.