आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाला कोणते पाणी पाजायचे हे मला कळते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - श्रीगोंदे हे माझे आजोळ आहे. येथील नियोजित नळपाणी योजनेसंदर्भात काही जण अडचणी उभ्या करीत आहेत. कोणाला कोणते पाणी पाजायचे हे आम्हाला चांगले कळते, अशा शब्दांत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्यावर सोमवारी टीका केली.

श्रीगोंद्यातील विविध ठिकाणचे रस्ते, मुस्लिम दफनभूमीतील जनाजा हॉल, बाजारतळावर दुकान केंद्र आदी चौदा विकासकामांचा प्रारंभ पाचपुते यांच्या हस्ते सोमवारी (24 जून) सायंकाळी येथे झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. श्रीगोंदे शहरातील नियोजित नळ योजनेच्या उद्भवास शेलार यांचा विरोध आहे. घोड धरणाऐवजी कुकडीच्या धरणांतील पाणी श्रीगोंद्याला पिण्यासाठी द्यावे याकरिता ते सातत्याने विरोधात बोलत आहेत. त्याचा संदर्भ घेत पाचपुते म्हणाले, श्रीगोंद्याच्या नळ योजनेची फाईल अंतिम मंजुरीसाठी दिली आहे. विकासकामांत कोणी अडचणी आणल्या, तर त्यांना सरळ करायला आम्हाला जमते. श्रीगोंदे हे माझ्या मामाचे गाव आहे. येथील लोकांचे प्रश्न मला अधिक माहीत आहेत. कोणाला कोणते पाणी आवडते व कोणाला कोणते पाणी पाजायचे हे मला चांगले समजते, असे पाचपुते म्हणाले.

यावेळी भोस, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष नाना कोथिंबिरे यांचीही भाषणे झाली.

व्यासपीठावर साईकृपाचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते, युवानेते विक्रमसिंह पाचपुते, प्रतिभा पाचपुते, माजी नगरसेवक पोपट खेतमाळीस आदी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

विकासासाठी 62 कोटी देणार
श्रीगोंद्याच्या विकासाकरिता आजवर 22 कोटी रुपयांचा निधी दिला. आणखी 62 कोटी देणार आहे. येत्या दीड वर्षात शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल. यातून श्रीगोंद्याच्या विकासात भर पडणार आहे, असे पाचपुते यांनी यावेळी सांगितले.