आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या दुकानदारीसाठी विरोधक करतात टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्यातील इतर जिल्हा परिषदांच्या तुलनेत नगर जिल्हा परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तथापि, केवळ आपली दुकानदारी चालवण्यासाठी काहीजण टीका करतात. त्यांचे एवढे मनावर घेण्याचे कारण नाही, असा टोला आमदार बबनराव पाचपुते यांनी काँग्रेसच्या सदस्यांचे नाव न घेता मारला.

जिल्हा परिषदेतील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करीत काँग्रेसचे सदस्य अण्णासाहेब शेलार यांनी अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीत झालेल्या समन्वय बैठकीत काँग्रेसच्या सदस्यांची नाराजी दूर करून या वादावर पडदा पाडण्यात आला होता. गुरुवारी सहकार सभागृहात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात पाचपुते यांनी काँग्रेसच्या सदस्यांना या संदर्भात टोला मारला.

उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती शाहूराव घुटे, हर्षदा काकडे, बाबासाहेब तांबे, सदस्य संभाजी दहातोंडे, प्रतिभा पाचपुते, बाजीराव गवारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद आदी यावेळी उपस्थित होते.

पाचपुते म्हणाले, मी इतर जिल्हा परिषदा पाहिल्या आहेत. त्या तुलनेत नक्कीच नगरमध्ये उत्कृष्ट काम सुरू आहे. केवळ त्रास देण्याच्या हेतूने टीका केली जाते. वास्तविक त्यांना त्यांची दुकानदारी चालवायची आहे. त्यामुळे विठ्ठलराव जास्त मनावर घेऊ नका..

शाळांचे आधुनिकीकरण होत असून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करून त्यांचा बौद्धिक विकास करण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे. स्पर्धेच्या युगात पालकांचा ओढा खासगी, विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक आहे. यासाठी आत्मपरीक्षण करून उपाय शोधायला हवा. शिक्षण हा पाया असून तो पक्का असायला हवा. शिक्षकांची भूमिका आईप्रमाणे आहे. जात, धर्म यापेक्षा ज्ञानाला अधिक महत्त्व आहे. केवळ पुरस्कार मिळवण्यापुरतेच काम करायचे, असे न करता सतत काम करत रहा आणि कामालाच गुरू माना, असे पाचपुते म्हणाले. मागील वर्षी निम्मे पुरस्कार महिलांना द्यायचे ठरले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

लंघे म्हणाले, जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत, याची जाणीव ठेवायला हवी. जिल्ह्यातील काही शाळा अनेक अडचणींवर मात करून आदर्श काम करीत आहेत. पुढील कालावधीत केंद्रप्रमुखांसाठी जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

राजळे म्हणाल्या, पोषण आहाराच्या विविध बाबींवर नेहमीच शिक्षकाला जबाबदार धरले जाते. अशा परिस्थितीत शिक्षकाने शिकवायचे कधी असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच कारवाई होण्याची टांगती तलवार असते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिक्षक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

दोन महिन्यांत मिळेल सॉफ्टवेअर
जिल्हाभरातील अनेक शाळा लोकसहभागातून संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. सॉफ्टवेअरसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. शिक्षण हक्क कायद्यानुसार दहा भौतिक सुविधा अनिवार्य असून प्रत्येक शाळेत किमान एक महिला शिक्षिका आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यातील 1 हजार 300 शाळांमध्ये एकही महिला शिक्षिका नाही, असे सीईओ रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

तीनही मंत्र्यांची दांडी
जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते होणार होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे यावेळी उपस्थित राहणार होते. परंतु तीनही मंत्र्यांनी दांडी मारल्याने अखेर माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांना ऐनवेळी हजेरी लावावी लागली.

आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी
संजय गायकवाड (अकोले), तानाजी गवळी (संगमनेर), प्रमोद रणधीर (कोपरगाव), शांताराम शेळके (राहाता), बाळू सरोदे (श्रीरामपूर), मंगला गवळी (राहुरी), राजेंद्र गायकवाड (नेवासे), महेश डाळिंबकर (शेवगाव), बाबासाहेब जायभाये (पाथर्डी), दत्तात्रेय भोसले (जामखेड), बाबासाहेब पवार (कर्जत), बापू झरेकर (श्रीगोंदे), कारभारी बाबर (पारनेर), उत्तम भोसले (नगर).