श्रीगोंदे- आमदार बबनराव पाचपुते यांच्या बहुचर्चित भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला. गुरुवारी (४ सप्टेंबर) मुंबईत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात दुपारी ४ वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व विनोद तावडे यांच्यासह भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पाचपुते यांच्या पक्षप्रवेशाबद्दलची पूर्वकल्पना येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यालयातून बुधवारी सायंकाळी देण्यात आली. प्रदेश सरचिटणीस आमदार राम शिंदे यांनीही भाजप नेत्यांना दूरध्वनीद्वारे हा संदेश दिला. पाचपुतेंचा भाजप प्रवेश येथील उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम देणारा आहे. दरम्यान, पाचपुतेंच्या भाजप प्रवेशाने येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तालुक्यात पाचपुते समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला. पाचपुतेंच्या प्रवेशानंतर येथील भाजपच्या उमेदवारीचा प्रश्नही निकाली निघाला आहे. पाचपुतेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. एकनाथ खडसे यांनी पाचपुतेंना पक्षात प्रवेश देणार असल्याची घोषणा केल्यानंतरही अनिश्चितता होती. पाचपुतेंच्या प्रवेशासाठी खडसे, तावडे आग्रही होते. शिवाय नितीन गडकरी, अमित शहा यांनीही त्यांच्या प्रवेशाला 'ग्रीन सिग्नल' दिल्याने हा सोपस्कार गुरुवारी पार पडणार आहे.
पाचपुतेंचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
बबनराव पाचपुते यांच्या भाजप प्रवेशाचा गुरुवारचा मुहूर्त नक्की झाल्याचा निरोप आल्यानंतर तालुक्यातील पाचपुते समर्थकांनी 'जय श्रीराम'चा नारा देत मुंबईकडे प्रयाण केले.